

लोणावळा: शहरामध्ये होणाऱ्या टपरीधारकांवरील कारवाईला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष वगळता सर्व पक्षांनी विरोध दर्शवला आहे. याकरिता आज लोणावळा नगर परिषदेसमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय ठिय्या आंदोलन सर्व पक्षांच्या वतीने करण्यात आले. मावळ तालुका टपरी व अतिक्रमण मुक्त करा आणि नंतर लोणावळ्यात या, अशी मागणीदेखील या वेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली. मावळ तालुक्यातील सर्वच भागांमध्ये अतिक्रमणे वाढलेली असताना त्याकडे कानाडोळा करत केवळ लोणावळा शहरातच कारवाई का? असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडीच्या नावाखाली कारवाई
लोणावळा शहरामध्ये 2008 यावर्षी अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे यावर कारवाई करत शहरातील सर्व टपऱ्या पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, अनेकजण आजही विस्थापित आहेत. त्यांचे पुनर्वसन झालेले नाही, असे असताना वारंवार वाहतूक कोंडीच्या व अतिक्रमणाच्या नावाखाली टपरी व्यवसायिकांना नोटीस देत त्यांना कारवाईची भीती दाखवली जात आहे. दिवाळीपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगर परिषदेमध्ये टपरी संघटनेची बैठकीत 15 नोव्हेंबर नंतर शहरामध्ये अतिक्रमण कारवाई करत रहदारीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवरदेखील कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे टपरीधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोणावळा-खंडाळा टपरी पथरी हातगाडी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष वगळता बाकी सर्व पक्षियांनी पाठिंबा दर्शवला आहे.
आधी पुनर्वसन करण्याची मागणी
तसेच, छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. या वेळी सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रहदारीला अडथळा होत असेल तर निश्चितपणे आम्ही टपऱ्या बाजूला करण्यास तयार आहोत. मात्र, त्यापूर्वी आमचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. राजकीय मंडळींनी ही मागणी करत असताना टपरी व्यवसायिकांनादेखील काही सूचना केल्या आहेत. रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी टपरी टाकणे बंद करा. आज शहरामध्ये वाहतुकीची समस्या निश्चितपणे निर्माण झालेली आहे. जर कोणी नवीन टपरी अशा पद्धतीने लावत असेल तर जुन्या टपरीधारकांनी व संघटनेने याला विरोध करणे गरजेचे आहे.
17 नोव्हेंबरनंतर ठरणार पुढची दिशा
लोणावळा नगर परिषदेच्या वतीने अधिकारी मनोज पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले व मुख्याधिकारी आल्यानंतर सोमवारी याबाबत सर्व पक्षांची एकत्रित बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे सांगितल्यानंतर ठिय्या आंदोलन 17 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नासिर शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू गवळी व ज्येष्ठ नेते वसंतराव भांगरे, मनसेचे शहराध्यक्ष निखिल भोसले व तालुका उपाध्यक्ष अमित भोसले, शिवसेनाचे शहराध्यक्ष संजय भोईर व विशाल पाठारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, वंचित बहुजन आघाडीचे संजय कांबळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाबा कांबळे, मानव अधिकार संघटनेचे निरंजन कांबळे व दयानंद रोकडे, भाजपच्या वतीने हर्षल होगले, लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने फिरोज शेख व अमोल शेडगे, लोणावळा खंडाळा टपरी संघटनेचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सचिव रमेश म्हाळसकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीनेदेखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.