

संतोष शिंदे
पिंपरी: टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांची अरेरावी, उद्धट वर्तन तसेच गणवेश आणि ओळखपत्राविना सुरू असलेल्या कामकाजाच्या तक्रारींची दखल घेत वाहतूक विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. नवे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर टोईंग कारवाईतील शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत कडक आदेश जारी केले आहेत.
शहरात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि 'नो पार्किंग'मधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅनची मदत घेतली जाते. मात्र, वाहन उचलताना काही कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांशी अरेरावीची भाषा वापरणे, योग्य माहिती न देणे, उर्मटपणे बोलणे तसेच गणवेश आणि ओळखपत्राशिवाय काम करणे अशा तक्रारी वेळोवेळी समोर येत होत्या. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची विक्रांत देशमुख यांनी गंभीर दखल घेत संबंधित बाबींवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
विक्रांत देशमुख यांनी काढलेल्या आदेशात टोईंग कारवाईदरम्यान गणवेशाशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यास काम करण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकृत ओळखपत्र गळ्यात परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय टोईंग करणाऱ्या सर्व वाहनांवर आवश्यक परवाने, वैध कागदपत्रे आणि अधिकृत माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आवश्यक माहिती नसलेल्या वाहनांकडून टोईंग कारवाई होऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
यातील विशेष बाब म्हणजे, टोईंग कारवाईपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडे गणवेश, ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याची खात्री करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेतील प्रभारी अधिकारी आणि अंमलदारांवरकडे देण्यात आली आहे. नियमांचे पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
वाहनचालकांकडून समाधान
टोईंग कारवाईच्या नावाखाली काही कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे वाहतूक विभागाने थेट आदेश काढून जबाबदारी निश्चित केल्याबद्दल अनेक वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, मात्र ती कायदेशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीनेच व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आदेशातील प्रमुख मुद्दे
गणवेशाशिवाय कोणत्याही टोईंग कर्मचाऱ्यास कारवाईची परवानगी नाही
सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकृत ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक
टोईंग वाहनांवर परवाने व आवश्यक माहिती प्रदर्शित करणे आवश्यक
नियमांचे पालन होत असल्याची खात्री प्रभारी अधिकाऱ्यांनी करावी
नियमभंग झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार