पिंपरी: केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक मिळविला आहे. तर, पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात क्रमांक एकचे स्थान प्राप्त केले आहे. शहराला सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी व वॉटर प्लस असे पुन्हा एकदा मानांकन मिळविले आहे. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवडचा देशात सहावा व राज्यात तिसरा क्रमांक होता.
दिल्ली येथे आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय नगरविकास, शहरी मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी पुररस्कार स्वीकारला. या वेळी सचिव श्रीनिवास कटिथिली, सेक्रेटरी रुपा मिश्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे व अधिकारी उपस्थित होते. (Latest Pimpri News)
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व ड्रेनेजलाईन व्यवस्थेची पाहणी करून मूल्यांकन केले जाते. स्वच्छ सर्वेक्षणाच्या 2024 च्या स्पर्धेमध्ये देशातील 4589 शहरांनी भाग घेतला होता. त्यात शहराने सातव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
कचरा मुक्त शहर पालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे संपूर्ण शहरात कचक्षययाचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावण्याचे कार्य नियमितपणे केले जात आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. कचरा येथे जमा केला जातो, त्या मोशी कचरा डेपोत प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, रीसायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा, वीज निर्मिती प्रकल्प आहे. यामुळे शहराने सेव्हन स्टार कचरा मुक्त शहर हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त केले आहे.