PCMC Chief Engineer Bribery Case: महापालिका मुख्य अभियंत्यास १९ हजारांची लाच मागितल्याने अटक

पाणीपुरवठा विभागातील तीन कामांच्या करारनाम्यांवर स्वाक्षरीसाठी लाच मागितल्याचा आरोप; निगडीतील निवासस्थानी एसीबीचा छापा
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे (वय 57, रा. प्राधिकरण, निगडी) यांना 19 हजारांची लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. 29) दुपारी तीनला अटक केली.

पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती व नवीन जलवाहिनी टाकण्याच्या पाच कामांच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी लाचेची त्यांनी मागणी केली होती. महापालिका वर्तुळात त्या घटनेची चर्चा रंगली होती.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मुख्य अभियंता म्हणून प्रमोद ओंभासे काम करीत आहेत. लाचप्रकरणी एका ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 11 जून 2026 रोजी तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ठेकेदाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती व नवीन जलवाहिनी टाकण्याची एकूण 91 लाख 57 हजार 68 रुपयांची पाच कामे घेतली होती. या कामांची वर्कऑर्डर मिळविण्यासाठी महापालिकेसोबत करारनामा करावा लागतो.

Arrested
PCMC Bribery Cases: नऊ वर्षांत अठरा अधिकारी-कर्मचारी लाचखोरीमुळे गजाआड; श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या पिंपरी महापालिकेतील प्रकार

करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी निविदा रकमेच्या 0.5 टक्के दराने 45 हजार 785 रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्या वेळी तक्रारदाराने काम झाल्यावर पाहू, असे सांगितले होते.

त्यानंतर पाचपैकी तीन निविदांच्या फाईलवरील स्वाक्षर्‍या करून त्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविल्या होत्या, मात्र उर्वरित प्रक्रिया प्रलंबित असल्याने तक्रारदाराने 29 मे 2026 रोजी मुख्य अभियंता ओंभासे यांची भेट घेतली.

त्या वेळी ओंभासे यांनी तीन फाईल्सच्या एकूण 38 लाख रुपयांच्या निविदा रकमेनुसार 0.5 टक्के दराने 19 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने 11 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

ओंभासे यांच्या निवासस्थानी टाकला छापा

तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी पडताळणी केली. त्यात लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या पूर्वीही ओंभासे यांनी त्या ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याचे पथकातील अधिकाऱ्यांकडे मान्य केले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Arrested
Pimpri News: कुटुंबीयांना सांगितले लंडनमध्ये असल्याचे; गहुंजेतील बंद फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार, दुपारी तीनला ओंभासे यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

पोलिस उपअधीक्षक नीता मिसाळ या सापळा अधिकारी, तर पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके हे पर्यवेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. या पथकात पोलिस हवालदार चंद्रकात जाधव, पोलिस कर्मचारी कैलास महामुलकर, चंद्रकात कदम यांचा समावेश होता.

दरम्यान, प्राधिकरण, निगडी येथील मुख्य अभियंता ओंभासे यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून तपासणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.