PCMC Modified Silencers | ‘बुलेट राजां’ना वाहतूक पोलिसांचा दणका: सांगवीत ४१५ सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर

रस्त्यांवर बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत फिरणाऱ्या ‘बुलेट राजां’ना पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी दणका दिला
Sangvi Traffic Police Road Roller On Bullet Silencers
Sangvi Traffic Police Road Roller On Bullet SilencersPudhari
Published on: 
Updated on: 

Sangvi Traffic Police Road Roller On Bullet Silencers

पिंपरी : रस्त्यांवर बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत फिरणाऱ्या ‘बुलेट राजां’ना पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. शहरभर विशेष मोहीम राबवून ४१५ बुलेटचे नियमबाह्य सायलेन्सर जप्त करण्यात आले. सांगवी वाहतूक विभागाच्या आवारात जमा केलेल्या या सायलेन्सरवर बुधवारी (दि. ७) बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले.

शहरात काही बुलेटस्वार कंपनीचा मूळ सायलेन्सर काढून मोठा आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर बसवितात. अचानक होणाऱ्या फटाक्यांसारख्या आवाजामुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर वाहनचालक दचकतात. निवासी परिसरातही या आवाजाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अशा बुलेटस्वारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली.

Sangvi Traffic Police Road Roller On Bullet Silencers
Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांना पाणीटंचाईची चिंता; १६ ऑक्टोबरपासून आणखी १० टक्के पाणीकपात

देहूरोडमध्ये सर्वाधिक कारवाया

या मोहिमेत देहूरोड वाहतूक विभागाने सर्वाधिक १०१ सायलेन्सर जप्त केले. त्याखालोखाल पिंपरीत ६०, बावधनमध्ये ४५, सांगवीत ४२, निगडी व चाकणमध्ये प्रत्येकी २५, दिघी-आळंदीत २४, हिंजवडीत २३, भोसरीत २२, चिखलीत १५, तळेगावात १४, वाकडमध्ये १२ आणि म्हाळुंगेत सात सायलेन्सर जप्त करण्यात आले. अशा प्रकारे १३ वाहतूक विभागांतून एकूण ४१५ सायलेन्सर जमा करण्यात आले.

कुठून येतात हे सायलेन्सर?

बुलेटचे मॉडिफाइड सायलेन्सर दुचाकींच्या ॲक्सेसरीज विकणाऱ्या दुकानांसह ऑनलाइन संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ‘इंदोरी’, ‘पंजाब’, ‘डॉल्फिन’, ‘शॉर्ट बॉटल’ आणि ‘फ्री फ्लो’ अशा विविध नावांनी त्यांची विक्री होते. साधारण दीड ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत अनेक प्रकारचे सायलेन्सर मिळतात. काही विशेष प्रकारांची किंमत अधिक असते. मात्र, शहरात जप्त केलेले सायलेन्सर नेमके कोणत्या विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात आले, याचा तपशील उपलब्ध नाही.

Sangvi Traffic Police Road Roller On Bullet Silencers
Pimpri Chinchwad Modified Silencer: पिंपरी-चिंचवडमध्ये मॉडिफाइड सायलेन्सरवर दणका; ४१५ सायलेन्सर, ५९१ नंबर प्लेटवर कारवाई

नियमभंग केल्यास दहा हजारांपर्यंत दंड

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १२० नुसार वाहनाच्या सायलेन्सरने निर्धारित ध्वनिमानकांचे पालन करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १९०(२) अंतर्गत ध्वनी किंवा वायुप्रदूषणाच्या मानकांचे उल्लंघन केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांपर्यंत कारावास अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. तसेच वाहनाच्या रचनेत अनधिकृत फेरबदल केल्यास संबंधित अन्य तरतुदींनुसारही कारवाई होऊ शकते.

बुलेटच्या इंजिनमधील ज्वलनानंतर तयार होणारे वायू एक्झॉस्ट पाइपमधून बाहेर पडतात. मूळ सायलेन्सरमध्ये आवाज कमी करण्यासाठी विशेष रचना असते. मॉडिफाइड सायलेन्सरमध्ये ती बदलल्याने आवाजाची तीव्रता वाढते. काही वेळा पूर्णपणे न जळलेले इंधन एक्झॉस्टमध्ये पेटल्याने फटाक्यासारखा आवाज निर्माण होतो. याला ‘एक्झॉस्ट पॉपिंग’ किंवा ‘आफ्टरफायर’ म्हणतात. आवाजाची तीव्रता इंजिनची स्थिती आणि सायलेन्सरच्या रचनेवर अवलंबून असते.

— सुरेश हुंबे, गॅरेजचालक, पिंपरी-चिंचवड

वाहनाच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाज निर्माण करणे हा नियमभंग असून, इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही धोका आहे. अशा वाहनांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. वाहनचालकांनी कंपनीने दिलेले मूळ सायलेन्सरच वापरावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

— विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news