

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निगडी, प्राधिकरण सेक्टर क्रमांक 23 येथून ते दापोडीपर्यंत सर्व्हिस रस्त्यावर भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे सुस्थितीतील रस्ते खराब झाले आहेत. योग्य प्रकारे खड्डे बुजवले जात असल्याने तेथे वारंवार खड्डे पडत आहेत. वेगातील वाहनांमुळे चाकांमुळे खडी व छोटे दगड उडून लागल्याने तसेच, दुचाकी घसरून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहेत. दुरुस्तीनंतर पुन्हा खड्डे पडत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून हे काम सुरू आहे. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, शंकरवाडी, संत तुकारामनगर, एच.ए. कंपनी, पिंपरी चौक, मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन आदी ठिकाणी खोदकाम करून डांबरीकरण करण्यात आले आहे.
मात्र, त्याचा दर्जा सुमार असल्याने चांगले रस्ते खराब झाले आहेत. वारंवार दुरुस्ती करूनही पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे खड्डी व छोटे दगड बाहेर आले आहेत. वेगात ये-जा करणार्या वाहनांच्या चाकांत अडकून खड्डी व छोटे दगड उडून दुचाकीस्वार किंवा पादचार्यास लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, दुचाकी वाहने घसरून पडून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक ठिकाणी दुरुस्तीनंतरही जमीन खचलेली दिसत आहे. या कामामुळे अनेक बीआरटी मार्ग अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. बीआरटी मार्गाची दुरुस्ती करूनही ती तग धरत नसल्याचे चित्र आहे. अनेक लोखंडी बॅरिकेड्स गायब झाले आहेत. त्यामुळे बीआरटी मार्ग विद्रुप दिसत आहे. दुरुस्तीसाठी वारंवार बीआरटी मार्ग बंद ठेवला जात असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. काही भागांत ऐन पावसात खोदकाम केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. तो रस्त्याही काही दिवसांत उखडला आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या या दुरुस्ती कामावरून दर्जावर शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेकडून वारंवार खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात आहे. मात्र, ते पुन्हा उखडले जाऊन खड्डे निर्माण होत आहेत. महापालिकेच्या या अजब दुरुस्ती कामावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.