

संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये हेल्मेटकडे दुर्लक्ष थेट जिवावर बेतत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मागील वर्षभरात शहरात झालेल्या 373 अपघातांपैकी तब्बल 209 अपघातांमध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या निष्काळजीपणामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात वेगाने गाडी चालवणे, सिग्नल न पाळणे आणि नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे अपघात वाढत आहेत. दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे धोकादायक ठरत आहे. अपघात झाल्यावर शरीराच्या इतर भागापेक्षा डोक्याला बसणारा मार जीवघेणा ठरत असल्याचे डॉक्टरही सांगतात. दरम्यान, अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवर घातले जाणारे स्पीड ब्रेकर (गतिरोधक) काही ठिकाणी उलट अपघातांचे कारण ठरत आहेत.
शहरातील अनेक रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने तयार केलेले उंचवटे दिसतात. हे उंचवटे अचानक आल्याने दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडते आणि अपघात होतात. नागरिकांकडून महापालिकेवर याबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. नियमांनुसारच गतिरोधक करावेत, असे न्यायालयाचे आदेश असतानाही अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी असे उंचवटे काढून टाकण्यात आले होते; मात्र, पुन्हा तेच प्रकार सुरू झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट वापराची सक्ती करणे, वाहतूक नियम पाळणे आणि रस्ते योग्य पद्धतीने दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हेल्मेट जीव वाचवते कसे?
हेल्मेटमध्ये बाहेर कडक कवच (हार्ड शेल) आणि आत मऊ थर (ईपीएस फोम) असतो. अपघातात धक्का बसल्यावर हा मऊ थर आकुंचन पावतो आणि धक्क्याची ताकद कमी करतो. कडक कवच धक्का मोठ्या भागावर पसरवते, त्यामुळे एका ठिकाणी जोराचा मार बसत नाही. तसेच, हेल्मेटमुळे घर्षण कमी होते. त्यामुळे रस्त्यावर घसरताना डोक्याचे संरक्षण होते. योग्य प्रकारे बांधलेला पट्टा हेल्मेट जागेवर ठेवतो, त्यामुळे अपघातावेळी ते निघून जात नाही. या सर्व प्रक्रियेमुळे मेंदूवर होणारा आघात कमी होतो आणि जीव वाचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
अपघात टाळण्यासाठी करा हे उपाय
दुचाकी चालवताना नेहमी चांगल्या प्रतीचे हेल्मेट घाला. त्याचा पट्टा व्यवस्थित बांधा. गाडी हळू आणि नियंत्रणात चालवा. सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि रस्त्यावरील चिन्हे पाळा. गाडी चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवा. पुढील वाहनापासून योग्य अंतर ठेवा. खड्डे, वळण आणि उंचवटे दिसले की गती कमी करा. रात्री लाईट नीट वापरा. सुरक्षितपणे गाडी चालवणे हीच अपघात टाळण्याची सोपी आणि खात्रीची पद्धत आहे.
हे करू नका
हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका. दारू पिऊन किंवा झोप येत असताना गाडी चालवू नका. मोबाईलवर बोलत किंवा मेसेज करत गाडी चालवणे टाळा. वेगात गाडी चालवणे, सिग्नल तोडणे आणि चुकीच्या बाजूने जाणे टाळा. स्टंट करणे किंवा इतरांना ओव्हरटेक करताना जीवाशी खेळ करू नका. रस्त्यावर अचानक येणाऱ्या उंचवट्याकडे दुर्लक्ष करून वेगात जाणे धोकादायक ठरू शकते.
मागील वर्षभरात झालेल्या अपघातांच्या तपासात अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हेल्मेट न घालणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे होय. दुचाकस्वारांनी हेल्मेट वापरले असते, तर त्यांचे जीव वाचू शकले असते. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा, वेगमर्यादा पाळावी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.
डॉ. विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी- चिंचवड