

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोकळा जागा, शेतजमिनी, जुनी बैठी घरे व इमारती तोडून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यासाठी शहरात भर लोकवस्तीत रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लान्ट उभे राहत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना सिमेंटच्या धुळीचा तसेच, अवजड वाहनांचा मोठा त्रास होत आहे. परिसरातील हवेत प्रदूषण वाढत आहे. परिणामी, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे मोकळी जागा दिसेल, तेथे उंचच उंच इमारती उभ्या केल्या जात आहेत. औद्योगिक कंपन्या व उद्योग बंद करून तेथे गृहप्रकल्प निर्माण होत आहे. जुनी बैठी घरे, चाळी व जुन्या इमारती पाडून नवनवे गृहप्रकल्प तयार केले जात आहेत. त्या बांधकामासाठी आरएसमी प्लान्ट भर लोकवस्तीजवळ उभे केले जात आहेत. तेथून बांधकाम प्रकल्पापर्यंत तयार काँक्रीट पुरवठा केला जातो. मात्र, काँक्रीट तयार करताना वाळू, खड्डी, सिमेंट व पाणी मिक्स केले जाते. त्यामुळे प्लान्टमधून मोठ्या प्रमाणात सिमेंट मिश्रित धूळ हवेत परसरत असून परिसरातील हवेत प्रदूषण वाढत आहे.
सतत अजवड वाहनांची ये-जा होत असल्याने पक्के रस्ते खराब होतात. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते. प्लांट व वाहनांच्या वर्दळीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांसह वाहनचालकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. त्याबाबत रहिवाशांकडून प्रदूषण मंडळ व महापालिका प्रशासनाकडे मोठ्या संख्येने तक्रारी करण्यात आल्या आहेत. आंदोलनेही झाली आहेत. काही तक्रारींची दखल घेऊन महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कारवाई केली आहे. मात्र, काही दिवसांनंतर ते प्लांट पुन्हा सुरू होतात. पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने हिरवळीचे तसेच, उद्यानाचे शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडची प्रदूषण पातळी धोकादायक पातळीवर जाऊन पोहचली आहे. त्याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे मत शहरवासीयांकडून व्यक्त केले जात आहे.
सिमेंटमिश्रित धूळ आरोग्यास घातक
आरएमसी प्लांटमधून निघणारी सिमेंटची सूक्ष्म धूळ फुप्फुसासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे दमा, त्वचेचे व श्वसनाचे आजार वाढत आहेत. विशेषत वृद्ध व बालकांना त्याचा अधिक त्रास होत आहे. ती धूळ थेट घरात पसरते. त्यामुळे घरात धूळीचा थर साचत आहे. तसेच, रस्त्यावर व झाडांवर धुळीचे थर निर्माण होत आहेत. परिणामी, प्लांटच्या आजूबाजूला राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकवस्तीपासून दूर प्लांट उभारण्याची गरज
पुणे महापालिकेतील नगरसेवकांनी शहरातील आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवण्यासाठी आणि अवैध प्रकल्प बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील आरएमसी प्लांट लोकवस्तीपासून दूर उभारण्याची मागणी होणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडमधील हवेच्या प्रदूषणात आरएमसी प्लांटचा मोठा वाटा असूनही, येथील लोकप्रतिनिधी ठोस भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वेळीत हे प्लांट नागरी वस्तीपासून लांब हलवले नाहीत, तर पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचे आरोग्य आणखी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नियमावली कागदावरच
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार, आरएमसी प्लांटभोवती उंच पत्रे लावणे, पाण्याचा फवारा मारणे आणि धूळ रोखण्यासाठी यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश प्लांटमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. दै. पुढारीने यापूर्वीही याबाबत अनेकदा वृत्त प्रसिद्ध करीत त्याबाबत आवाज उठवला आहे. मध्यंतरी पिंपरी-चिंचवड राज्यातील सर्वात प्रदूषित शहर ठरले होते, त्याला हे अनियंत्रित आरएमसी प्लांटच जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घ्यावी
शेजारील पुणे महापालिकेने लोकवस्तीपासून दूर अंतरावर आरएमसी प्लांटला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रमाणे आपल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा. शहरवासीयांच्या आरोग्यासाठी सर्व नगरसेवकांनी आरएमसी प्लांट व प्रदूषणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.
शिल्लक काँक्रीट रस्त्यावर दिले जाते फेकून
आरएमसी प्लांटमध्ये तयार झालेले काँक्रीट अवजड वाहनांतून बांधकाम प्रकल्पावर नेऊन टाकले जाते. शिल्लक काँक्रीट त्या वाहनातून थेट रस्त्यावर व मोकळ्या जागेत फेकले जाते. त्यामुळे रस्ते खराब होतात. डांबरी व काँक्रीट रस्त्यावर पडल्याने ते दगडासारखे टणक होते. त्याला धडकून दुचाकीस्वाराचा अपघात होण्याचा धोका आहे. तसेच, ती वाहने वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करत बेदकारपणे वाहन चालवत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यात दुचाकीस्वाराचा जीव जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
शहरात प्रदूषणाचे हॉट स्पॉट
शहरात सर्वच भागांत बांधकामे होत आहेत. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडीसारख्या आयटी पार्कजवळ असलेल्या बांधकामांच्या वाढत्या संख्येमुळे तेथे हवेतील प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. चिखली, मोशी, भोसरी, दिघी, चऱ्होली, डुडुळगाव या भागातही गृहप्रकल्पांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने आरएमसी प्लांटची संख्या मोठी आहे. पुनावळे, ताथवडे, रावेत, थेरगाव, चिंचवड, आकुर्डी, मोरवाडी भागांतही या प्लांटचा नागरिकांना त्रास होत आहे. सांगवी भागात मुळा नदीच्या काठावर नव्याने प्लांट झाल्याने शांत असलेल्या ममतानगर भागांतील नागरिकांना त्रास होत आहे. नागरी वस्तीजवळ असलेल्या प्लांटमुळे रात्रीच्या वेळीही धुळीचे लोट हवेत तरंगताना दिसतात. शहरातील या भागांत आरएमसी प्लांटची संख्या अधिक असून तेथे प्रदूषणाची पातळी अनेक वेळा धोक्याच्या पातळीच्या पलीकडे जाते.
प्लांट तात्काळ बंद करण्याचा रहिवाशांचा आग्रह
लोकवस्तीजवळील सर्व आरएमसी प्लांट तात्काळ बंद करावेत. काँकीटची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालावेत. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम व उपाययोजना लागू कराव्यात. वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा. रस्त्यांची नियमित 2 वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जावी. स्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे, एअर गनद्वारे नियमितपणे पाण्याचा फवारा मारला जावा. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक ती आरोग्यसेवा पुरवावी. रस्त्यांवरील झाडांची देखभाल व निगा राखली जावी, अशी मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.
नियम न पाळणाऱ्या आरएमसी प्लांटवर कारवाई
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिनांक 17 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकानुसार आरएमसी प्लांट तसेच, बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आरएमसी प्लांट तसेच, बांधकाम ठिकाणे व बांधकाम साहित्य साठवणूक ठिकाणी धूळ व वायू प्रदूषण केल्यास दंड करून, त्या आस्थापना सील केल्या जात आहेत. शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सध्या मध्यम (एक्यूआय 100 ते 150) या श्रेणीत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आरएमसी प्लांटधारक, बांधकाम व्यावसायिक तसेच, बांधकाम साहित्य पुरवठादारांना धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. नियमभंग करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
सील तोडून आरएमसी प्लांट बेकायदा सुरू
पिंपळे निलख येथील दोन आरएमसी प्लांट महापालिकेने कारवाई करत त्याला सील ठोकले होते. मात्र, त्या व्यावसायिकाने ते सील तोडत ते आरएमसी प्लांट पुन्हा सुरू केले आहे. त्यासंदर्भात तक्रार देऊनही महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नाही. फौजदारी गुन्हे दाखल केले जात नाहीत. परिणामी, रहिवाशांना धुळीचा तसेच, आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे, असे रविराज काळे यांनी सांगितले.