

पिंपरी: महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील तब्बल 15 हजार 300 पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी (शारीरिक) चाचणीला बुधवार (दि. 11) सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत 462 पदांसाठी ही भरती होत असून, या भरतीसाठी 14 हजार 779 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडांगणात ही मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीसाठी दररोज सुमारे 500 ते 800 उमेदवारांना टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी घेण्यात येणारी ही मैदानी चाचणी अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. क्रीडांगण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, आरएफआयडी प्रणाली आणि बायोमेट्रिक तपासणी वापरण्यात येत असून, प्रत्येक उमेदवाराची ओळख व उपस्थिती अचूकपणे नोंदवली जात आहे. यापूर्वीही याच मैदानावर पोलिस भरतीच्या मैदानी व शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या असून, येथे सिंथेटिक ट्रॅकची सुविधा असल्याने उमेदवारांना धावण्याच्या चाचणीत अचूकता राखता येणार आहे. पुढील टप्प्यात होणाऱ्या लेखी परीक्षेदरम्यानही कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
भरतीप्रक्रियेत उमेदवारांना 50 गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर व 100 मीटर धावणे, गोळाफेक, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर व 100 मीटर धावणे, गोळाफेक चाचणी घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीत निर्धारित निकषांनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना उपलब्ध जागांच्या संख्येनुसार एकास दहा या प्रमाणात गुणानुक्रमे लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षा 100 गुणांची असून, त्यात अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, व्याकरण तसेच वाहतूक नियमांवर आधारित 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी परीक्षेच्या टप्प्यातही पारदर्शकता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
सरावासाठी मिळाला अधिकचा वेळ
नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे पोलिस भरतीप्रक्रिया काही काळ लांबणीवर पडली होती. मात्र, या कालावधीत भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरावासाठी अधिक वेळ मिळाल्याने अनेक उमेदवारांनी शारीरिक व लेखी तयारी अधिक जोमाने केल्याचे चित्र सध्या मैदानी चाचणीत दिसून येत आहे.
पोलिस भरतीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेतील कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही, आरएफआयडी आणि बायोमेट्रिक्ससारख्या आधुनिक प्रणालींचा प्रभावी वापर केला जात आहे.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड