

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होत आहे. शहरातील नागरिकांना मतदार यादीमधील आपले नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदारांना मतदार यादी मधील भाग क्रमांक व अनुक्रमांक याबरोबरच मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता ठळकपणे दिसण्यासाठी लालरंगात उपलब्ध आहे. ती सुविधा वापरण्यासाठी शहरातील मतदारांना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मतदार नाव शोधणे (सर्च व्होटर नेम) या लिंकवर जावे. मराठी किंवा इंग््राजी या दोन्ही भाषेमध्ये मतदारांना आपले नाव शोधता येईल.
मतदारांना आपला मतदान ओळखपत्र क्रमांक माहीत असल्यास त्यानुसार देखील शोध घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपला प्रभाग क्रमांक निवडून, मतदाराचे प्रथम नाव, मधले नाव व आडनाव यांची नोंद केल्यानंतर संबंधित मतदाराचे मतदान केंद्र व इतर सर्व माहिती सर्चद्वारे उपलब्ध होते.
‘सारथी’ सुविधेचा घ्या लाभ
महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनला फोन करून (8888006666) आपले मतदार ओळख क्रमांक किंवा संपूर्ण नाव सांगून या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
संबंधित सारथी कॉल ऑपरेटर आपल्याला माहिती सर्च करून देण्यास मदत करेल. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.