

पिंपरी: मुसळधार पाऊस आणि निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांना "ज्या ठिकाणी आहात, तेथेच सुरक्षित थांबा", असे महत्त्वाचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून सोमवार (दि. ६) करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा आणि अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरासह परिसरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते, पूल आणि अंडरपास पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांनी केलेल्या आवाहनालाही पोलिस आयुक्तालयाने पाठिंबा दर्शविला आहे. दिंडी प्रमुख, वारकरी आणि भाविकांनी कोणतीही घाई न करता सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे, प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील सूचना मिळाल्यानंतरच पुढील प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाखो वारकरी शहरातून मार्गक्रमण करणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, परिस्थितीवर पोलिस आणि प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी पार पाडली तिहेरी जबाबदारी; गुन्हे शाखेची विशेष पथकेही सज्ज
पालखी सोहळ्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर तिहेरी आव्हान उभे राहिले आहे. एका बाजूला शहरातील पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षितता आणि मदतकार्य, दुसऱ्या बाजूस कोलमडलेली वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी, तर तिसरीकडे मंगळवारपासून (दि. ७) सुरू होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेची तयारी, अशा तिहेरी जबाबदाऱ्या पोलिसांना एकाचवेळी पार पाडाव्या लागल्या.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवार (दि. ७), तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला बुधवार (दि. ८) सुरुवात होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांची यंत्रणा बंदोबस्ताच्या तयारीत व्यस्त आहे. लाखो वारकरी शहरातून मार्गक्रमण करणार असल्याने वाहतूक नियोजन, कायदा-सुव्यवस्था आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा आधीच रस्त्यावर उतरविण्यात आला आहे. याशिवाय गर्दीचा गैरफायदा घेऊन सोनसाखळी चोरी, पाकिटमारी, मोबाईल चोरी आणि इतर गुन्हे करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांसह गुन्हे शाखेची विशेष पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
सोमवारी सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक चौक, अंडरपास, पूल आणि प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. वाहतूक विस्कळीत झाल्याने हजारो नागरिक रस्त्यावर अडकले. अनेक ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी वाहने बंद पडली, तर पर्यायी मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. या परिस्थितीत वाहतूक पोलिसांना एकाच वेळी अनेक ठिकाणी धाव घ्यावी लागली. काही ठिकाणी रस्ते बंद करून बॅरिकेड्स उभारण्यात आले, तर काही ठिकाणी वाहतूक वळवून पर्यायी मार्ग खुले करण्यात आले. पाण्यात अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मदत करणे, क्रेन बोलावून बंद पडलेली वाहने हटविणे, अंडरपासमध्ये कोणी प्रवेश करू नये म्हणून पोलिसांनी प्रत्यक्ष उभे राहून वाहने रोखणे, अशा जबाबदाऱ्या दिवसभर पार पाडाव्या लागल्या.
काही सखल भागात पाणी झपाट्याने वाढत असल्याने स्थानिक पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग करून देणे, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणे, अशा अनेक प्रसंगांमध्ये पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले. त्यामुळे शहरातील अनेक चौकांमध्ये पोलिसांची अक्षरशः धावपळ सुरू असल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.