

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरावर आभाळ फाटल्याप्रमाणे सोमवार (दि. ६) मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे संपूर्ण उद्योगनगरी अक्षरशः ठप्प झाली होती. प्रमुख चौक, अंडरपास, महामार्ग, सेवा रस्ते, पूल आणि सखल भाग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कार्यालयीन वेळेतच अनेक रस्ते अचानक बंद करावे लागल्याने नोकरदार, विद्यार्थी, औद्योगिक कामगार आणि मालवाहतूक करणारे वाहनचालक रस्त्यावरच अडकून पडले. शहरातील तब्बल ५९ ठिकाणी पाणी तुंबले, ३५ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, तर ११ पूल पाण्याखाली गेल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला. पर्यायी मार्गांवर वाहनांचा प्रचंड ताण निर्माण झाल्याने शहरभर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर पहाटेपासून वाढत गेला. त्यामुळे सकाळी कार्यालयीन वेळेत शहरातील वाहतुकीची घडी पूर्णपणे विस्कटल्याचे पहावयास मिळाले. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, वाकड, हिंजवडी, ताथवडे, थेरगाव, चिखली, मोशी, निगडी, देहूरोड, आळंदी, चाकण, भोसरी आणि सांगवी परिसरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. वाहनचालकांना पुढे रस्ता आहे की नाला, याचाही अंदाज येत नव्हता. अनेक दुचाकीस्वारांनी जीव धोक्यात घालून वाहने चालविली, तर काही चारचाकी वाहनचालकांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभी करून पाणी ओसरण्याची वाट पाहणे पसंत केले.
शहरातील वल्लभनगर, एचए, साई चौक, पुनावळे, ताथवडे आणि मामुर्डी अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. अनेक वाहनचालकांनी पाण्याचा अंदाज न आल्याने अंडरपासमध्ये प्रवेश केला; मात्र वाहने बंद पडल्याने ती ढकलत बाहेर काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत वाहनचालकांना मदत केली आणि बंद पडलेली वाहने सुरक्षित ठिकाणी हलविली.
पर्यायी रस्त्यांवर ताण
ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे ताथवडे-रावेत मार्गावर वाहनांचा प्रचंड ताण निर्माण झाला. हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा वेळ कित्येक पटींनी वाढला. अनेकांना कार्यालय गाठण्यासाठी तीन ते चार तास लागले.
नैसर्गिक ओढे-नाले बुजविल्याचा फटका
पावसामुळे थेरगाव-चिंचवड पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाकड गावठाणात मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठावरील मंदिर परिसरात पाणी शिरले. हिंजवडी-माण रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. निवासी भागांनाही पावसाचा मोठा फटका बसला. दर्शिले चौक आणि लक्ष्मी मंदिर परिसरातील नदीकाठच्या पाच घरांमध्ये पाणी शिरले, नैसर्गिक ओढे-नाले बुजविल्याचा फटका मारुंजी परिसराला बसल्याचे बोलले जात आहे. मारुंजीतील एअर कॅसल सोसायटीसह अनेक गृहसंकुलांच्या आवारात पाणी शिरल्याने पार्किंग, लिफ्ट लॉबी आणि तळमजले जलमय झाले. या वेळी घरातील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अनेक मार्गांवर पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, अंडरपास, पूल किंवा सखल रस्त्यांमधून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, तसेच वाहतूक पोलिसांनी बंद केलेल्या मार्गांवरील बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा. पाण्याची पातळी वाढल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबून प्रशासनाच्या पुढील सूचनांचे पालन करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बोटीतून रहिवाशांची सुटका
मुसळधार पावसामुळे मारुंजी परिसरातील काही सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक रहिवासी घरातच अडकून पडले. याबाबत माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने सोसायटीत प्रवेश करून अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफचे जवान परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
'आयटी' पुन्हा तुंबली
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका नेहमीप्रमाणे वाकड-हिंजवडी परिसराला बसला. हिंजवडी-माण आयटी पार्क, मुंबई-बंगळूर महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील वाहतूक अक्षरशः कोलमडली. इंदिरा कॉलेजसमोरील मुंबई-बंगळूर महामार्ग तब्बल एक किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत पाण्याखाली गेला. सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर साचलेल्या पाण्यात अनेक कार, बस आणि अवजड वाहने बंद पडली. पोलिसांना क्रेनच्या सहाय्याने बंद पडलेली वाहने हटवावी लागली, तर काही वाहने नागरिकांच्या मदतीने ढकलत बाजूला काढण्यात आली.
महत्त्वाचे पूल पाण्याखाली
दिघी-आळंदी परिसरात इंद्रायणी नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्याने आळंदी, मरकळ, तुळापूर, धानोरी आणि चाकणकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. निगडी विभागातील धनेश्वर, बटरफ्लाय, केशवनगर आणि रिव्हर व्ह्यू परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला. चिखली-मोशी परिसरातील प्रमुख रस्ते गुडघाभर पाण्याखाली गेल्याने वाहनांचा वेग अत्यंत मंदावला. पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी फाटा दोन्ही बाजूंनी बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
सेल्फीच्या मोहापायी जीव धोक्यात
शहरभर वाहतूक पोलिसांची अक्षरशः धावपळ सुरू होती. एका बाजूला रस्ते बंद करणे, पर्यायी मार्गांवर वाहतूक वळविणे, बंद पडलेली वाहने हटविणे आणि अडकलेल्या नागरिकांना मदत करणे, अशी कसरत पोलिसांना करावी लागली. दुसरीकडे काही नागरिक मात्र पूल, नदी आणि अंडरपासमधील पाण्याचे फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी गर्दी करत होते. अनेकांना पोलिसांनी समज देत तेथून हटविले.
अंडरपास ठरताहेत डोकेदुखी
आयटी हब परिसरातील सूर्या अंडरपास, सयाजी अंडरपास आणि पुनावळे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती, ताथवडे अंडरपास बॅरिगेट लावून पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे गावठाणातून महामार्गावर येणाऱ्या रस्त्यांवर मोठी कोंडी झाली. गावठाणाकडून महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गावरील अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला.