

संतोष शिंदे
पिंपरी: गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीचे केवळ नाव, पत्ता आणि छायाचित्र एवढीच माहिती आता पोलिसांच्या रेकॉर्डवर राहणार नाही. आरोपीचा आयरिस स्कॅन, फोटोग्राफ, जैविक नमुना (DNA), शरीरावरील ओळखचिन्ह, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, नातेवाइकांची माहिती आणि डेमोग्राफिक डेटा अशी विविध स्वरूपातील माहिती एकाच ठिकाणी संग्रहित केली जाणार आहे. त्यामुळे आरोपीची अक्षरशः ‘कुंडली’ पोलिसांच्या रेकॉर्डवर उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्तरावर यासाठी मापन संकलन युनिट (MCU) कार्यान्वित करण्यात आले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हास्तरावर मापन संकलन युनिट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत किवळे येथील पोलिस उपआयुक्त कार्यालयात हे युनिट सुरू करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट २०२६ पासून ते कार्यान्वित करण्यात आले आहे.
अटक होताच युनिटमध्ये हजेरी
पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना मोजमापे नोंदविण्यासाठी युनिटमध्ये हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. युनिटच्या दैनंदिन कामकाजाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ अशी निश्चित करण्यात आली आहे. आरोपीला युनिटमध्ये आणताना संबंधित तपासी अधिकारी अथवा अंमलदार उपस्थित असणे अनिवार्य करण्यात आले आहे. आरोपीला योग्य पोलिस बंदोबस्तात आणण्याची जबाबदारी संबंधित प्रभारी अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांवर राहणार आहे. महिला आरोपी असल्यास तिच्यासोबत महिला पोलिस अधिकारी अथवा महिला अंमलदार उपस्थित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
तपास अधिकाऱ्यावर जबाबदारी
आरोपीला युनिटमध्ये आणताना तपासी अधिकाऱ्यांनी संबंधित गुन्ह्याची एफआयआर आणि अटक फॉर्म सोबत आणणे आवश्यक आहे. अटक फॉर्ममध्ये आरोपीची आवश्यक वैयक्तिक आणि ओळखविषयक माहिती पूर्णपणे भरलेली असणे अपेक्षित आहे. तसेच, तपासी अधिकाऱ्याचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, सेवार्थ आयडी आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक करण्यात आले आहे. आरोपीसोबत तपासी अधिकारी अथवा अंमलदार हजर राहणे अनिवार्य असल्याने मोजमाप नोंदविताना आवश्यक माहितीची तत्काळ खातरजमा करता येणार आहे.
प्रत्येक आरोपीची स्वतंत्र डिजिटल ओळख
या प्रणालीमुळे आरोपीची ओळख अधिक अचूकपणे निश्चित करणे, त्याचा गुन्हेगारी पूर्वेतिहास पडताळणे तसेच अन्य गुन्ह्यांच्या तपासात त्याच्याशी संबंधित माहिती तत्काळ उपलब्ध करून घेणे पोलिसांना सोपे होणार आहे. अटक आरोपींची मोजमापे गोळा करणे, जतन करणे, आवश्यकतेनुसार प्रसारित करणे आणि नियमानुसार नष्ट करणे यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
डोळ्यांच्या आयरिसपासून ‘डीएनए’पर्यंत नोंद
मापन संकलन युनिटमध्ये आरोपीच्या डोळ्यांतील आयरिसची विशिष्ट डिजिटल नोंद केली जाणार आहे. त्यासोबत आरोपीचे छायाचित्र आणि आवश्यक प्रकरणांमध्ये जैविक नमुन्याशी संबंधित ‘डीएनए’ माहितीही जोडली जाणार आहे. आरोपीचे संपूर्ण नाव, कायमचा आणि सध्याचा पत्ता, नातेवाईकांची माहिती, शरीरावरील ओळखचिन्ह, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसह इतर डेमोग्राफिक माहितीही यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. बायोमेट्रिक आणि डिजिटल नोंदी उपलब्ध झाल्याने आरोपीने वेगळे नाव अथवा पत्ता सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची ओळख पडताळण्यास पोलिसांना मदत होणार आहे. विशेषतः वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अथवा आंतरजिल्हा गुन्हे करणाऱ्या आरोपींचा माग काढताना ही यंत्रणा तपास अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
गंभीर गुन्ह्यांत ‘डीएनए’ला स्वतंत्र ओळख क्रमांक
महिला आणि बालकांविरुद्धचे अपराध तसेच सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपासी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जैविक नमुना घेतला असल्यास संबंधित डीएनए अहवालाला स्वतंत्र क्रमांक दिला जाणार आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ते प्रमाणपत्रही मापन संकलन युनिटमध्ये नोंदणीसाठी सादर करावे लागणार आहे. त्यामुळे न्यायवैद्यकीय पुरावे आणि संबंधित आरोपीची ओळख यांची नोंद एकसंध पद्धतीने ठेवता येणार आहे.
कोणाची मोजमापे घेता येणार?
मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आलेली व्यक्ती, अटक केलेली व्यक्ती तसेच प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची मोजमापे घेता येणार आहेत. स्थानबद्धसह अन्य प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, चांगली वर्तणूक अथवा शांतता राखण्यासाठी बंधपत्र दिलेल्या व्यक्ती तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित व्यक्तीची मोजमापेही घेता येणार आहेत. मात्र, विधिसंघर्षित बालकांना मोजमापासाठी युनिटमध्ये आणू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मापन प्रक्रियेला एखाद्या व्यक्तीने नकार दिल्यास संबंधितावर बीएनएस कलम २२१ अन्वये कारवाईची तरतूद असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये तीन महिन्यांच्या कारावासासह ५०० रुपये दंडाच्या तरतुदीचा उल्लेख करण्यात आला आहे.
मापन संकलन युनिटमुळे अटक आरोपींची बायोमेट्रिक, जैविक आणि वैयक्तिक माहिती नोंदविली जाणार आहे. त्यामुळे आरोपीची अचूक ओळख पटविणे, त्याचा पूर्वेतिहास तपासणे आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांशी त्याची सांगड घालणे अधिक सोपे होईल. तपासाच्या दृष्टीने या नोंदी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
प्रदीप जाधव, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२, पिंपरी-चिंचवड