

पारगाव: आंबेगाव तालुक्यात सध्या ऊसतोड हंगाम जोमात सुरू असून शेतशिवारात ऊसतोड कामगारांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. या हंगामात ऊस वाहतुकीसाठी बैलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उसाचे ओझे वाहताना बैलांच्या पायांना काटे, दगड, धारदार अवजारे किंवा सुकलेली ऊसकांडे यांमुळे इजा होण्याची शक्यता अधिक असते. ही इजा टाळण्यासाठी ऊसतोड कामगारांकडून बैलांच्या पायांच्या खुरांना लोखंडी पत्री ठोकण्याची पारंपरिक पद्धत सध्या अनेक ठिकाणी राबवली जात आहे.
आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग भीमाशंकर व जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतो. अनेकदा उसाचे ओझे टायर बैलगाडीत चढवताना किंवा उतरवताना बैलांचे पाय घसरून दुखापत होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी खुरांना पत्री ठोकल्यामुळे बैलांची पकड अधिक मजबूत होते, घसरण कमी होते आणि परिणामी ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेला मदत होते. विशेषतः बैलांच्या पायांना होणाऱ्या अपघाती इजा टाळल्या जात असल्याचे ऊसतोड कामगार सांगतात.
पत्री ठोकताना खुरांना इजा होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाते. ऊसतोड हंगामात कामगार व जनावरांची सुरक्षितता लक्षात घेऊन आंबेगाव तालुक्यात बैलांच्या पायांना पत्री ठोकण्याची ही पद्धत मोठ्या प्रमाणावर अवलंबली जात आहे. बैलांच्या खुरांना ठोकलेल्या पर्त्यांमुळे त्यांना अतिरिक्त संरक्षण मिळते. खडकाळ जमीन, काटेरी रस्ते, चिखल किंवा ओलसर शेतातून चालताना खुरांची होणारी झीज कमी होते. यामुळे बैल अधिक काळ तंदुरुस्त राहतात आणि ऊसतोडीचे काम सुरळीत पार पडण्यास मदत होते. काही अनुभवी कामगारांच्या मते, पत्री ठोकल्यानंतर बैलांची चाल सुधारते व ओझे ओढताना त्यांना कमी त्रास होतो, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाघ यांनी सांगितले.
व्यवसायाला उतरती कळा
मागील 15 ते 20 वर्षांपूर्वी शेती मशागतीसाठी प्रत्येक घराच्या अंगणात बैलजोडी पाहायला मिळत असे. या बैलांना पत्र्या मारण्याचे काम केले जात असे. आता यंत्रयुगीन काळात बैलांची संख्या कमी झाल्याने पत्र्या मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा आली आहे. पूर्वी बैलांच्या साहाय्याने शेती मशागत, शेतमालाची वाहतूक केली जात असे. शिवाय नामांकित यात्रा-जत्रेला हौसेने बैलगाडीच्या साहाय्याने शेतकरी जात होते. बैलांना दोन वेळेला खुराक, यात्रेच्या मुहूर्तावर त्यांची शिंगे साळणे, बैलांच्या खुरांची झीज होऊ नये म्हणून त्यांच्या खुरांना (नख्या) वर्षातून दोनदा पत्री मारली जात असे. त्यामुळे पत्री मारणे, शिंगे साळणे असा व्यवसाय करणारे कारागीर गावोगावी फिरत असत.
पत्र्या मारण्यासाठी बैलाला विशिष्ट प्रकारच्या फासाने जमिनीवर आडवे केले जाई. ही एक प्रकारची कला होती. परंतु, काळाच्या ओघात शेती मशागतीची जवळपास सर्व कामे यांत्रिक पद्धतीने होऊ लागली आणि घरोघरी दिसणारी बैलजोडी गायब झाली. अगदी छोट्या शेतकऱ्याला छोटे यंत्र, मोठ्या शेतकऱ्यांना विविध प्रकारची औजारे पाहिजे त्या आकारात मिळू लागली आहेत. त्यामुळे बैलजोडी देखील फक्त हौस म्हणून पाळली जाऊ लागली. त्यामुळे पत्री मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. आमच्या आजोबा-पणजोबांच्या काळापासून आम्ही हा व्यवसाय करीत असून, आता हा व्यवसाय करणारी आमची ही शेवटची पिढी असल्याचे इसाक शिकलकर यांनी सांगितले.