

मिलिंद कांबळे
पिंपरी: श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मोठ्या खर्चिक विकास कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याने कर्ज घेण्याची वेळ आली आहे. आर्थिक कोंडी असताना चिंचवड येथील महापालिका भवनाच्या नव्या इमारतीवर खर्चाचा सपाटा सुरू आहे. त्यावर सुमारे एक हजार कोटी रुपयांचा वारेमाप खर्च करण्यात येत आहे. प्रशासनाच्या उधळपट्टीच्या या भूमिकेवर आश्चर्य व रोष व्यक्त केला जात आहे.
नवीन महापालिका भवन (मुख्य प्रशासकीय इमारत) चिंचवड येथील सायन्स पार्कच्या शेजारी उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इमारतीच्या बांधकामांवर आत्तापर्यंत तब्बल २८६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. इमारतीची रंगरंगोटी, फर्निचर, सुशोभिकरण, हिरवळ यावर तब्बल ३५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. डाटा सेंटर व वीजपुरवठा जोडणीवर ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. या दोन निविदा लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा व अजितसृष्टी उभारण्यासाठी किमान १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, इतर काही खर्च आहेत. तो सर्व खर्च सुमारे एक हजार रुपये कोटीच्या आसपास पोहचत आहे.
श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या महापालिकेकडून महापालिका भवनावर वारेमाप खर्च केला जात आहे. तर, दुसरीकडे खर्चिक विकासकामांना निधी नसल्याचे कारण देत तब्बल १ हजार २४६ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज काढण्यात येत आहे. प्रशासनाच्या या परस्पर विरोधी भूमिकेवरून शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.
सायन्स पार्क शेजारी महापालिकेची एकूण ३३.८६ एकर जागा आहे. त्यापैकी ८.६५ एकर जागेत नवीन महापालिका भवनाचे बांधकाम सुरू आहे. तेथे १८ मजली दोन आणि ६ मजली दोन अशा चार पर्यावरणपूरक इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. ते काम जानेवारी २०२३ ला सुरू झाले असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे. कामाची तीन वर्षांची मुदत जुलै २०२५ ला संपल्याने दिलेली एका वर्षाची मुदत संपली आहे. मात्र, काम अद्याप सुरूच आहे. बांधकाम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
चारशे कोटींच्या दोन निविदा प्रसिद्धीसाठी तयार
सध्या सुरू असलेल्या मूळ निविदेचे काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या आवारातील मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी), पाण्याची टाकी, ड्रेनेजलाईन व्यवस्था, संपूर्ण इमारतीचे फर्निचर, रंगरंगोटी, हिवरळ, सुशोभिकरणाचे काम केले जाणार आहे. तसेच, विद्युत जोडणी, प्रकाश व्यवस्था, डाटा सेंटर, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा आदी कामांची स्वतंत्र दोन निविदा काढण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या कामांची मुदत १२ महिने आहे. तसेच, नवीन महापालिका भवनाच्या आवारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच, भव्य अजितसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्याचा खर्च १०० कोटी रुपयांचा अपेक्षित आहे.
अजितदादांच्या पुतळ्याचा आराखडा अद्याप निश्चित नाही
नवीन महापालिका भवनाच्या आवारात दर्शनी भागात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची घोषणा सत्ताधारी भाजपाने केली होती. अद्याप त्याचा आराखडा तयार करण्यात आलेला नाही. पुतळ्याची उंची २२ मीटर असेल, असे सांगण्यात येत आहे. त्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभिकरण तसेच, कारंजे असणार आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरसाठी अजितदादांनी दिलेले योगदान सर्वांना समजावे म्हणून भव्य अजितसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून आराखडा अंतिम केला जाणार आहे. त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले
..अशी आहे इमारत
या ठिकाणी ६ ते १८ मजल्यांच्या चार पर्यावरणपूरक इमारती आहेत. प्रत्येक इमारतीला तीन तळघरे (बेसमेंट) आहे. येथे नागरी सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, ई-गव्हर्नन्स सेंटर, ग्रंथालय, क्लिनिक, वाचनालय, प्रदर्शन हॉल, संग्रहालय, बहुउद्देशीय हॉल, भव्य सभागृह, पत्रकार कक्ष असणार आहे. नगरसेवक संख्या वाढ लक्षात घेऊन भव्य सभागृह व दालने असतील. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी या इमारतीत बसू शकतील, अशी क्षमता आहे. सर्व विभागांचे कामकाज येथून चालणार असल्याने सर्व विभाग एका छताखाली येतील. विविध विभागात तब्बल दोन हजार ६८९ अधिकारी व कर्मचारी बसू शकतील इतकी आसन व्यवस्था असणार आहे. चारचाकी ४७९ आणि दुचाकी दोन हजार ७१३ वाहने पार्क करता येईल, असे प्रशस्त वाहनतळ असणार आहे. एकूण १६ लिफ्ट असतील. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर इमारत असल्याने रस्ते, मेट्रो, बीआरटीएस, ई-आरटीएस सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हीटी असणार आहे. ती इमारत नागरिकांसह, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचार्यांना सोईस्कर ठरणार आहे.
काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन
इमारतीचे काम वेगात सुरू असून, बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. इमारतीच्या आवारातील कामे, एसटीपी, पाण्याची टाकी, फर्निचर, रंगरंगोटी, सुशोभिकरण, हिरवळ आदी कामांची निविदा स्थापत्य प्रकल्प विभागाकडून काढली जाणार आहे. तर, डाटा सेंटर व वीजपुरवठाविषयक कामांची निविदा विद्युत विभाग काढणार आहे. ती दोन्ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या सहशहर अभियंता संध्या वाघ यांनी सांगितले.