

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या मार्गावर मेट्रो विस्तारीत मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर निगडी येथील टिळक चौकात नवीन चौथे मेट्रो स्टेशन बांधण्यात येत आहे. त्या प्रकल्पाचा महापालिका हिस्सा 121 कोटी 97 लाख रुपये आहे. तसेच, नव्या मेट्रो स्टेशनसाठी 25 कोटी रुपयांचा हिस्सा वाढला आहे, असे एकूण 146 कोटी 97 लाख रुपयांचा आर्थिक भार महापालिकेवर आहे. त्यापैकी पूर्वीच 49 कोटी रुपये महामेट्रोला देण्यात आले आहेत. नुकतेच 50 कोटी रुपयेही देण्यात आले आहेत.
शहरात दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो धावत आहे. पिंपरीपासून निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत 4.413 किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या एकूण 910 कोटी 18 लाख रुपये खर्चास केंद्राच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाचे 23 ऑक्टोबर 2023 ला मंजुरी दिली आहे. त्या प्रकल्पात चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक असे तीन मेट्रो स्टेशन होते. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन निगडी येथील टिळक चौकातील चौथ्या मेट्रोस स्टेशनच्या वाढीव 50 कोटी खर्चाला 10 मार्च 2026 ला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढून 960 कोटी 18 लाख रुपयांवर पोहचला आहे.
दरम्यान, या मार्गावरील बहुतांश सर्व पिलर उभारण्यात आले आहेत. व्हाया डक्ट उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका एकूण 147 कोटी 97 लाख रुपयांची रक्कम महामेट्रोला देणार आहे. त्यापैकी 49 कोटी रुपये महापालिकेकडून 24 ऑक्टोबर 2024 ला देण्यात आले आहेत. महामेट्रोने26 जून 2025 च्या पत्रानुसार 35 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच, टिळक चौकातील मेट्रो स्टेशनसाठी 10 मार्च 2026 च्या पत्रानुसार 25 कोटी रुपये मागितले आहेत. असे एकूण 60 कोटी रुपये महामेट्रोला द्यायचे आहेत. महापालिकेच्या सन 2025-26 च्या अर्थसंकल्पास मेट्रोसाठी 50 कोटीची तरतूद केली आहे. त्यातून 50 कोटी रुपये महामेट्रोला देण्यात आले आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत 99 कोटी रुपये महामेट्रोला दिले आहेत. महापालिकेस अजून शिल्लक 47 कोटी 97 लाख रुपये महामेट्रोला द्यावे लागणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सर्वाधिक आर्थिक भार
पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकार 67 कोटी 2 लाख आणि राज्य सरकार 79 कोटी 8 लाख रुपये अनुदान देणार आहे. तर, महापालिकेचा हिस्सा सर्वांधिक 121 कोटी 97 लाख रुपये इतका आहे. उर्वरित 402 कोटी 11 लाखांचा निधी कर्जातून महामेट्रोकडून उभा केला जाणार आहे. तसेच, महापालिका भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्वसाहतीकरण आणि बांधकाम कालावधीतील व्याजाकरिता महापालिका 137 कोटी 87 लाख रुपये देणार आहे. चौथ्या मेट्रो स्टेशनचा खर्च निम्मा निम्मा म्हणजे प्रत्येकी 25 कोटी रुपये राज्य सरकार व महापालिका करणार आहे. या प्रकल्पात महापालिकेचा एकूण हिस्सा 284 कोटी 84 लाख रुपये इतका आहे.
पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग
महापालिकेचा हिस्सा-121 कोटी 97 लाख रुपये
टिळक चौक मेट्रो स्टेशनचा हिस्सा-25 कोटी रुपये
महापालिकेचा एकूण हिस्सा-146 कोटी 97 लाख रुपये
महामेट्रोस दिलेली एकूण रक्कम-99 कोटी रुपये
देणे असलेली उर्वरित रक्कम-47 कोटी 97 लाख रुपये
महापालिकडून देण्यात आलेल्या जागांची किमत- 137 कोटी 87 लाख रुपये