

वर्षा कांबळे
पिंपरी : प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. भोसरी, थेरगाव, पिंपरीसारख्या भागात हवा गुणवत्ता निर्देशांक 200- 250 पेक्षा अधिक नोंदविला जात आहे. हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत गेल्याने श्वासोच्छवास, फुफ्फुसांचे विकार असलेल्या रुग्णांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, हवा शुध्द करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. त्या यंत्रणादेखील फेल ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात वाढती वाहनांची संख्या, मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामे, खराब रस्ते, नूतनीकरणाच्या नावाखाली सतत केली जाणारी खोदकामे, कारखाने यांच्या वायू प्रदूषणामुळे पुन्हा शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे.
खराब श्रेणीत पोहोचलेली शहराची हवा शहरवासीयांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोका वाढत आहे. तसेच, अस्थमा, सीओपीडी, इतर फुप्फुसांच्या विकार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होतो. या दिवसांमध्ये श्वसन विकाराच्या रुग्णांनी योग्य काळजी घ्यावी. तसेच, लक्षणे वाढताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे. तर, पर्यावरण प्रेमींकडून हवा प्रदूषण कमी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून, केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचा आरोप होत आहे.
धुळीमुळे सतत ठसका, खोकला
शहरतील हवा खराब श्रेणीमध्ये असल्याने नागरिकांना धुळीमुळे सतत ठसका लागणे आणि खोकल्याच्या रुग्णात वाढ होत आहे. यामध्ये दुचाकीवर जाणारे, बसमध्ये प्रवास करणारे, पादचारी यांना धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. महापालिकेने धूळ कमी करणाऱ्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या असल्यातरी खराब रस्ते, बांधकामे यांनी हवेची गुणवत्ता ढासळत आहे.
श्वसनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ
महापालिका वैद्यकीय विभागाकडील सलग तीन वर्षांच्या आकडेवारीवरून शहरात प्रदूषणामुळे श्वसनाच्या रुग्णसंख्येत सतत भर पडत असल्याचे दिसून येते. 2020-21 या वर्षात अशा विकारांचे फक्त 361 रुग्ण होते. दुसऱ्याच वर्षी 2021-22 तीनपट वाढ होऊन 1 हजार 301, तर 2022-23 मध्ये ही रुग्णसंख्या 2 हजार 321 पर्यंत पोहोचली. सतत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2023 - 24 मध्ये 2 हजार 378 पर्यंत
पोहचली आहे.
मार्चमध्ये हवेची गुणवत्ता
100 च्या पुढे
पिंपरी-चिंचवड शहरातील वायु प्रदूषणातील काही प्रदुषके हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहेत. वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र, वाहनांची वाढती संख्या आदी बाबी हवा प्रदुषणासाठी कारणीभूत आहेत. ही हवा मध्यम प्रदुषित श्रेणीमध्ये गेली आहे. मार्च महिन्यामध्ये दोन ते तीन दिवस सोडले तर हवेची गुणवत्ता 100 च्या पुढे 146 पर्यंत गेली आहे.
आरोग्यावर विपरीत परिणाम
अशा हवेमुळे फुफ्फुस, हृदयविकार, मुले आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होतो. अगदी दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास श्वसनाचे विकार होतात. मानवाच्या आरोग्यावर पर्यावरणाचे चांगले व विपरीत परिणाम होत असतात. योग्य आहार आणि स्वच्छ पर्यावरण यामुळे आयुष्य वाढते, तर प्रदूषणामुळे प्रकृती खालावते. जगातील एक चतुर्थांश आजार व मुलांना होणारे एक तृतीयांश आजार पर्यावरणीय कारणांमुळे उद्भवतात. पर्यावरण अहवालात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील तरंगणारे धुलिकण तसेच नायट्रोजन ऑक्साईड या प्रदूषित घटकांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे अधोरेखित केले आहे.
कचरा जाळल्यामुळे प्रदूषणात वाढ
पिंपरी-चिंचवडचा विचार करता खराब रस्ते, बांधकाम, औद्योगिक आणि शहरी कचरा जाळण्याचे प्रकार व त्यातच कमी झालेले हरितक्षेत्र व ढासळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पिंपरी चिंचवडकरांचा श्वास कोंडत आहे. शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात दम्याच्या रुग्णामध्ये वाढ होत होती. सध्या उन्हाळ्यातदेखील दम्याचे आणि श्वसन विकारांचे रुग्ण वाढत आहेत. वातावरणातील प्रदूषणामुळे दरवर्षी 10 ते 20 टक्के रुग्ण वाढत आहेत. तसेच, दम्याच्या रुग्णांना उन्हाळ्यातदेखील नियमित उपचाराची गरज भासत आहे. पादचारी नागरिक व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना प्रदूषणांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो.
डॉ. रवींद्र साळवे, चेस्ट फिजिशियन
गेल्या तीन महिन्यांतील स्थिती
जानेवारी महिन्यामध्ये फक्त 18, 19, 20, 27, 28 हे पाच समाधानकारक तर हवेचा निर्देशांक 100 च्या पुढे होता. या महिन्यात 6 जानेवारी रोजी हवेचा निर्देशांक 156 इतकी नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यात 26, 27, 28 हे तीन दिवस समाधानकारक असून, इतर दिवस 100 च्या पुढे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक होता. 4 फेब्रुवारी रोजी 159 इतका पुढे गेला होता. 25 मार्चपर्यंत चार दिवस हवेचा निर्देशांक समाधानकारक असून, 11 मार्च रोजी 140 इतका निर्देशांक नोंदविला गेला.