

पिंपरी: गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारात या उत्सवाच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. घरगुती गणपतीच्या सजावटीत मखर हा अविभाज्य भाग असतो. गणेशोत्सव जवळ येताच आकर्षक मखर खरेदीकडे गणेशभक्तांचा कल असतो.
थर्माकोलच्या बंदीमुळे बाजारात इकोफ्रेंडली मखर उपलब्ध झाले आहेत. यामध्ये लाकडी, कापडी, फोमशीट, पुठ्ठ्यापासून बनविलेल्या मखरांना पसंती आहे.
बाजारात ठिकठिकाणी वेगवेगळ्या आकारांतील मखरांनी बाजारपेठ फुलू लागली आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून मखर तयार करण्यावर भर देण्यात आलेला दिसत आहे.
लाकडी मखर
स्थानिक विक्रेत्यांनी गणरायाच्या उत्सवासाठी लाकडापासून मखर तयार केले आहे. त्याभोवती कापडाची आकर्षक फुलांची सजावट केली आहे. पातळ लाकड्याच्या पट्ट्या जोडून कापड किंवा नुसती फुलांचीदेखील सजावट केली जाते. तर, काहीवेळा झुरमुळ्या, कुंदन व टिकल्यांचा वापर केला आहे.
कापडी मखर
कापडाला झालर, लेख, टिकल्या, मणी यांचा वापर केलेली दोन ते सहा फुटापर्यंत ही कापडी मखरे उपलब्ध आहेत. ही मखरे घडी करून ठेवता येणार्यासारखी व वॉशेबल आहेत.
कार्डबोर्ड व पुठ्ठ्यापासून बनविलेले मखर
आकर्षक रंगकाम, स्पार्कल्स, टिकल्या, अॅक्रॅलिक कलर वापरून अतिशय आकर्षक मखरे तयार करण्यात आली आहेत. वजनाला हलकी असल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे.
फोमशीटचे मखर
फोमशीटपासून तयार केलेले रेडिमेड व फोल्ड करता येणारे विविध सुंदर प्रकारची मखरे बाजारात उपलब्ध आहेत. विविध मंदिरे, किल्ले, गड यांच्या प्रतिकृती असलेल्या. खडे, आरसे व टिकल्यांनी सजविलेल्या आणि लाईटचा वापर केलेली मखरेदेखील उपलब्ध आहेत.