

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात आलेल्या प्रत्येक जाहिरातीच्या होर्डिंगवर क्यूआर कोड लावणे बंधनकारक आहे. ज्या होर्डिंगवर क्यूआर कोड आणि होर्डिंगधारकांची माहिती दर्शविणारी पाटी नसेल, असे होर्डिंग अनधिकृत समजून कारवाई केली जाईल.
तसेच अधिकृत मंजुरीपेक्षा जास्त आकारमानाचे होर्डिंग उभारल्यास होर्डिंगची परवानगी रद्द करून दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिला आहे.
नेत्यांचे वाढदिवस, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक यासह कोणतेही कार्यक्रम असो, होर्डिंगवर जाहिरात केली जाते. अनेक जण होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेत नसल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. अशा होर्डिंगधारकांवर महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले असून, कृत्रिम बुद्धिमतेसारख्या (एआय) तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केला जात आहे.
शहरातील किवळे येथे एप्रिल 2023 मध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा बळी गेला होता. त्या दुघर्टनेनंतर महापालिकेने शहरातील 174 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले. शहरात सद्य:स्थितीत सुमारे एक हजार 631 होर्डिंग अधिकृत असल्याचा दावा आकाशचिन्ह व परवाना विभागाने केला आहे.
मंजुरीपेक्षा जास्त आकारमानाचे होर्डिंग उभारल्यास फौजदारी
शहरात महापालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग उभारू नये. होर्डिंग उभारताना शासन नियम व सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात. अधिकृत मंजुरीपेक्षा जास्त आकारमानाचे होर्डिंग उभारल्यास होर्डिंगची परवानगी रद्द करून दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी दिला आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार धरणार
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगधारकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करावी. त्याचा पाया, लोखंडी सांगाड्याला गंज लागला नसल्याची खात्री करावी. धोकादायक होर्डिंग तत्काळ काढून घ्यावेत.
आपल्या मालकीचे होर्डिंग वादळ, वारा, जोराची हवा याद्वारे पडणार नाही, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यानंतरही कोणताही अनुचित प्रकार घडल्यास होर्डिंगधारकांना जबाबदार धरण्यात येईल, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.