

पिंपळे गुरव: कल्पतरू बीआरटीएस मार्गालगत पदपथावर उभारण्यात आलेली वाहतूक सुरक्षारक्षकांची केबिन सध्या प्रशासकीय दुर्लक्षाचे प्रतीक बनली आहे. ही केबिन पादचाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरत आहे. एकेकाळी बीआरटीएस मार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या कामकाजासाठी लाखो रुपये खर्च करून ही केबिन उभारण्यात आली होती. मात्र, आज या मार्गावर सुरक्षारक्षक कुठेही कार्यरत दिसत नसल्याने ही केबिन केवळ अडगळ ठरत आहे.
अपघाताचा धोका वाढला
महापालिकेच्या सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली ही केबिन सध्या पदपथाच्या मध्यभागी उभी असल्याने नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध असलेली जागा कमी झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पदपथावरील अडथळ्यामुळे अनेकांना थेट वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली ही केबिन आज सुरक्षेलाच धोका निर्माण करत असल्याचे चित्र आहे. वापर शून्य असलेल्या या केबिनमुळे नागरिकांची गैरसोय शंभर टक्के होत असल्याची भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. जेथे सुरक्षारक्षकच नाहीत, तेथे ही केबिन कशासाठी ठेवली आहे? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
केबिनच्या आजूबाजूला कचरा
गंभीर बाब म्हणजे देखभालीअभावी केबिनच्या परिसरात अस्वच्छता वाढत असून, कचरा साचत आहे. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे. बीआरटीएस व्यवस्थेतील बदलानंतर सुरक्षारक्षकांची गरज संपली असेल, मात्र त्यानंतरही ही केबिन हटविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी जनतेच्या पैशातून उभारलेली सुविधा अडगळीत पडून सार्वजनिक जागेचा अपव्यय होत आहे.
ही योजना केवळ ठेकेदार पोसण्यासाठीच का?
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सार्वजनिक वाहतूक जलद होण्यासाठी बीआरटीएस प्रकल्प उभारला आहे; परंतु बहुतांश सर्वच मार्गावर या प्रकल्पाच्या तीन तेरा वाजलेल्या पाहण्यास मिळत आहेत. हा प्रकल्प उभारल्यानंतर या मार्गावरील खासगी वाहतूक नियंत्रणासाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करून सुरक्षा केबिन उभारली. मात्र, आज या केबिनदेखील बीआरटी मार्गासारखीच धूळ खात पडलेली दिसत आहेत. त्यामुळे महापालिका केवळ विकास प्रकल्प ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी उभारते का ?, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
उपयोग संपला असेल तर केबिन हटवा
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने या केबिनची आवश्यकता तातडीने तपासून निर्णय घेण्याची गरज आहे. जर या संरचनेचा कोणताही उपयोग उरला नसेल तर ती त्वरित हटवून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा करावा; अन्यथा या केबिनचा अन्य शासकीय कामासाठी पुनर्वापर करून सार्वजनिक निधीचा योग्य उपयोग करावा. कल्पतरू बीआरटीएस मार्गावरील ही केबिन केवळ एक निरुपयोगी केबिन नसून, नियोजनशून्यता आणि प्रशासकीय उदासीनतेचे उदाहरण ठरत आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधांचा योग्य वापर होत आहे का, याबाबतही ही बाब अनेक प्रश्न निर्माण करत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
यासंदर्भात संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल. सध्या केबिनचा कोणताही उपयोग होत नसल्याचे आढळले तर ती तिथून उचलून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
चंद्रकांत मोरे, उपअभियंता, शहर दळणवळण विभाग, महापालिका
संबंधित ठिकाणी अतिक्रमण विभागाचे पथक पाठविण्यात येईल. प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा केबीनचा कोणताही वापर होत नसल्याचे आढळल्यास ती त्वरित हटविण्याची कारवाई करण्यात येईल.
राजू कांबळे, कार्यालयीन अधीक्षक, ड क्षेत्रीय कार्यालय