

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. 19) शहरात 40 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. यापूर्वी शुक्रवारी (दि. 17) रोजी 40 अंश तापमान नोंदविले गेले होते. दोन दिवस 40 अंश असणाऱ्या तापमानाने शहरवासीयांना चांगलाच घाम फुटला आहे.
सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांची घामाघूम अवस्था होत आहे. दुपारी बाहेर पडणाऱ्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. दुपारी एक नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. सतत पंखे, कुलर यांची हवा देखील दमट वाटत आहे. नागरिक गारव्याच्या शोधात उद्याने, मोकळी मैदाने आणि तलावासारख्या ठिकाणी गर्दी करत आहेत. उन्हाचा परिणाम जनावरे, कुत्री, मांजरी यांच्यावर देखील होताना दिसत आहेत. प्राणी ओलाव्याच्या ठिकाणाचा शोध घेत आहेत.
रात्री देखील मोठा उकाडा जाणवत आहे. फॅनची हवा दमट असल्याने घामाघूम अवस्था होत आहे. नागरिकांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. सतत घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी, थकवा, जळजळ, त्वचेला खाज, घामोळ्या विकारात वाढ झाली आहे. दुचाकी चालक आणि नागरिक उन्हामध्ये बाहेर पडताना स्कार्फ, टोपी, गॉगल, छत्री यांचा वापर करत आहेत. थंड पेयांना मागणी वाढली आहे. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी थंडावा देणारा आहार आणि पेयांचा आधार घेतला जात आहे. सुती, पांढऱ्या, हलक्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला जात आहे.