

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात खेळांसाठी उत्तम मैदाने नाहीत. जे क्रीडांगण व स्टेडिमय उपलब्ध आहेत, त्यांची योग्य निगा राखली जात नाही. नेहरूनगर, पिंपरी येथील सात वर्षापासून पडून असलेले अण्णासाहेब मगर स्टेडियम बांधण्यास महापालिकेस वेळ नाही. अशी परिस्थिती असताना बोर्हाडेवाडी, मोशी येथील तब्बल 151.67 एकर जागेत कोट्यवधी रुपये खर्चून गोल्फ कोर्सचे मैदान विकसित करण्याचा घाट घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील मैदाने, क्रीडांगणांची दुरवस्था झाली आहे. अनेक भागांत मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान उपलब्ध नाही. नाईलास्तव मुलांना मोकळ्या जागेत व रस्त्यावर खेळावे लागते. खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षकांकडून वारंवार तक्रारी करुनही मैदान दुरूस्तीकडे कानाडोळा केला जात आहे.
शहरात खेळांच्या सोयी-सुविधांबाबत समाधानकारक परिस्थिती नाही. नेहरूनगर येथील अण्णसाहेब मगर स्टेडियम सन 2019 ला जमीनदोस्त करण्यात आले. त्या ठिकाणी वांद्रे-कुर्ला व्यापारी कॉम्प्लेसच्या धर्तीवर क्रीडा संकुल उभारण्यात येणार होते. त्याचे सादरीकरणही सर्व पदाधिकारी व गटनेत्यांसमोर तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले होते. मात्र, हा प्रकल्प पुढे काही सरकला नाही. त्यामुळे मगर स्टेडियमचे मैदान गेल्या सात वर्षापासून धूळ खात पडले आहे. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात महापालिकेचे खेळाचे एकही मैदान नसल्याने पीडब्ल्यूडीच्या मैदानावर सराव करावा लागत आहे.
असे असताना, महापालिकेकडून बोर्हाडेवाडी, मोशी येथील 151.67 एकर जागेत गोल्फ कोर्स व क्लब विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनासह सत्ताधारी आग्रही असल्याचे दिसत आहे. येत्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी मिळाल्यानंतर जुन्या आरक्षणात बदल करून गोल्फ कोर्स क्लबचे नवे आरक्षण टाकले जाणार आहे. त्या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. शहराला जागतिक दर्जावर ओळख मिळावी, हे कारण पुढे करून मोठ्या प्रमाणात खर्चाचा घाट घालण्यात आल्याने शहरवासीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
मैदानाच्या हिरवळीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, पाण्याची मागणी वाढत असून, शहरातील अनेक हाऊसिंग सोसायट्यांना वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, महापालिकेकडून मोठ्या मोठ्या गृहप्रकल्पांना बांधकाम परवानगी दिली जात आहे. त्यामुळे पाण्याची गरज भागवताना महापालिकेतवर ताण वाढतच आहे. मुळशी धरण तसेच, ठोकरवाडी धरणातून पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. असे स्थिती असताना गोल्फ कोर्सच्या विस्तीर्ण हिरवळ व झाडांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार आहे. ते पाणी प्रशासन कोठून आणणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विकासकामांच्या आरक्षणांवर हातोडा
महापालिकेच्या विकास योजना आराखड्यात मोशी येथील गट क्रमांक 327, 435, 436, 437, 438, 439, 440, 441, 442, 443 या एकूण 61.38 हेक्टर जागेत विविध विकासकामांसाठी आरक्षणे टाकली आहेत. त्या आरक्षणांना मंजुरीही मिळालेली आहे. तेथे वेगवेगळे दहा आरक्षणे आहेत. त्यात 12 मीटर ररस्ते, 18 मीटर रस्ते, पार्किंग, दोन रिक्रिएशन कॉम्प्लेक्स, तीन एसएससीसी, जलाशय अशी आरक्षणे आहेत. त्या सर्व 61.38 हेक्टर (151.67 एकर) जागेत गोल्फ कोर्स क्लबचे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास तेथील दहा आरक्षणांवर हातोडा पडणार आहे. परिणामी, त्या सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागणार आहे.
मोशीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव बारगळला
मोशी येथेच आरक्षण क्रमांक 1/204 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमसह बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय सन 2019 मध्ये झाला आहे. त्यासाठी 400 कोटी रुपये खर्चास तसेच, अर्थसंकल्पात नवीन लेखाशीर्ष तयार करण्यास तत्कालिन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची जुलै 2023 ला मान्यता दिली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर ते स्टेडिमय विकसित केले जाणार होते. मात्र, पुढे त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, या प्रकल्पास विरोध करत, गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना शहरात नव्याने स्टेडिमय उभारून पांढरा हत्ती का पोसायचा, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.
महापालिका व्हिजनमध्ये गोल्फ कोर्सचा समावेश
महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा पुढील 50 वर्षांचा आराखडा सादर केला आहे. शहराचा शाश्वत विकास करताना जागतिक दर्जाचे गोल्फ क्लब आणि पीसीएमसी क्लब विकसित करण्याचा मनोदय आयुक्तांनी जाहीर केला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले जाणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा समावेश आहे.
शहरात खेळांच्या सुविधा पुरवण्याकडे साफ दुर्लक्ष
रायफल शूटींग, फुटबॉल, क्रिकेट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव, मुष्टियुद्ध रिंग, सायकलिंगचा वेलोडॅम, जिम्नॅस्टिक, तिरंदाजी, घोडेस्वारी आदी खेळांच्या सुविधा नाहीत. तर, वापराअभावी हॉकी खेळाचे नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियम धूळ खात पडले आहे. बॅडमिंटन कोर्ट हॉलची दुरवस्था झालेली आहे. टेनिस कोर्टची अवस्था फारशी समाधानकारक नाही. इंद्रायणीनगर, भोसरी येथील अॅथलेटिक्स खेळांचा सिंथेटिक ट्रॅकचा दर्जा सुमार असल्याने तो वारंवार खराब होत आहे. शहरातील एकमेव अॅथलेटिक्स ट्रॅकची अशी दयनीय स्थिती आहे. महापालिकेच्या व्यायामशाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. व्यायामाशाळेतील साहित्य चोरीला जाते.
निव्वळ टक्केवारीसाठी खर्चीक प्रकल्पाचा घाट
पिंपरी-चिंचवड शहरात गोल्फचे खेळाडू संख्या नगण्य आहे. तो खेळ श्रीमंताचा आहे. पिंपरी-चिंचवड कामगारनगरीत कोट्यवधी रुपये खर्च करून गोल्फ कोर्स तयार करण्याची आवश्यकता नाही. केवळ टक्केवारी लाटण्यासाठी आणि मर्जीतील ठेकेदार पोसण्यासाठी हा खर्चिक प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील बांधकाम व्यावसायिकांचे भले होणार आहे. शहरातील विविध भागांत आवश्यकतेप्रमाणे खेळांचे मैदाने विकसित करून मुलांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.