

पिंपरी: आगामी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रभावी आणि संदेशप्रधान देखावे साकारून समाजात जनजागृती करावी. शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मंडळांसह समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित 'श्री मोरया पुरस्कार-२०२५' पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी (दि. २) आकुर्डी येथे झाला. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना पोलिस आयुक्त चौबे म्हणाले की, गणेश मंडळांनी सायबर सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक नियमांचे पालन आणि अन्य सामाजिक विषयांवरही देखावे साकारावेत. गणेशोत्सव जल्लोषात साजरा करा; मात्र या उत्सवात कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या. अशा लोकांना सरळ करण्याचे कौशल्य पोलिसांकडे आहे.
मुंबईतील गणेशमूर्ती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत मूर्तीची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंडप परिसरात स्वयंसेवक तैनात ठेवावेत. चोरीसह अन्य घटनांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवावेत. लेजरमुळे होणारी इजा गंभीर असल्याने त्याचा वापर टाळावा. डीजेबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असेही चौबे यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. झाडांच्या फांद्या छाटणे, अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक केबल्स हटविणे यासह आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिकेची पथके मंडळांच्या संपर्कात असून मिरवणूक मार्गांची पाहणी केली जात आहे. गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावटीचा वापर करावा, प्लास्टिक टाळावे तसेच निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
'श्री मोरया पुरस्कार' ही पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांची संकल्पना असून, मागील चार वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखणाऱ्या, नियमांचे पालन करणाऱ्या तसेच सामाजिक प्रबोधनासाठी उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना या पुरस्काराद्वारे गौरविण्यात येते.
अंमली पदार्थविरोधी 'रील-पोस्टर' स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
तरुणाईच्या माध्यमातून अंमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृती व्हावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने हाती घेतलेल्या 'रील, पोस्टर आणि शॉर्ट व्हिडीओ' स्पर्धेला शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सहभागाची वाढती संख्या पाहता प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (दि. ७) वाढविण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून मागील महिन्यात अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी 'व्हर्च्युअल टाऊनहॉल' घेण्यात आला होता.
या वेळी विद्यार्थ्यांनी पोस्टर, इन्स्टाग्राम रील आणि शॉर्ट व्हिडीओच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत पोलिस आयुक्तालयाकडे मोठ्या प्रमाणात प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थविरोधी संदेश देणारे पोस्टर, रील किंवा शॉर्ट व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर प्रसारित करावे लागणार आहे. पोस्ट करताना पिंपरी-चिंचवड पोलिसांचे अधिकृत '@pcpcitypolice' हे हँडल टॅग करणे बंधनकारक आहे.
गोपनीय माहिती देण्याचा संदेशही स्पर्धेत
'स्पीक अप, रिपोर्ट कॉन्फिडेन्शिअली' या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला आहे. अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा अन्य हालचालींबाबत नागरिकांना माहिती असल्यास ७७९८१००११२ या अंमली पदार्थविरोधी हेल्पलाइनवर गोपनीयपणे कशी माहिती देता येईल, यावरही विद्यार्थ्यांना प्रवेशिका तयार करता येणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविरोधातील अन्य नावीन्यपूर्ण विषयांनाही संधी देण्यात आली आहे.
विद्यार्थी आणि प्राचार्य दोघांचाही सन्मान
स्पर्धेतून तीन उत्कृष्ट प्रवेशिका निवडण्यात येणार आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित शाळा अथवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा/देखील पोलिस आयुक्तालय स्तरावरील विशेष कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे. अधिकाधिक शाळा, महाविद्यालये आणि युवकांनी सहभागी होऊन अंमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शैक्षणिक परिसर अंमली पदार्थमुक्ततेसाठी संस्थांसोबत जनजागृती
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी आणि शैक्षणिक परिसर अंमली पदार्थमुक्त ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शैक्षणिक संस्थांना सोबत घेत व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ११० शाळा-महाविद्यालयांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांसह सुमारे ४५० जण सहभागी झाले.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सोमवारी (दि. ३१) मावळ तालुक्यातील आंबी येथील पुष्पलता डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिरीष पाटील, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलिस आयुक्त प्रवीण मोरे, प्रिया डमाळे, डॉ. नरेंद्र कुशवाह, डॉ. सुरेखा पाटील आणि डॉ. शीतल नाईकवाडे या वेळी उपस्थित होते.
पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी सांगितले की, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत सातत्याने जनजागृती पोहोचणे आवश्यक आहे. पोलिस, शाळा-महाविद्यालये, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास प्रत्येक शैक्षणिक परिसर अंमली पदार्थमुक्त करता येऊ शकतो.
विमल फाउंडेशनचे व्यसनमुक्ती समुपदेशक डॉ. विल्यम साळवी यांनी व्यसनमुक्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. अनिष भट्ट यांनी व्यसनामागील कारणे, त्याचे मानसिक व शारीरिक परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याच्या उपायांवर मार्गदर्शन केले. अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची माहिती देत त्यांच्या दुष्परिणामांचे सादरीकरण केले. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर पाटील यांनी उपस्थितांना अंमली पदार्थविरोधी शपथ दिली.