Pimpri Chinchwad EV: पिंपरी-चिंचवडकरांचा ईव्हीकडे वाढता कल; वर्षभरात ३१,७२७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

पेट्रोल-डिझेलच्या खर्चाला पर्याय; दुचाकीपासून चारचाकीपर्यंत ईव्हीला पसंती, मात्र चार्जिंग आणि रेंजचे आव्हान कायम
EV Vehicle
EV VehiclePudhari
Published on
Updated on

बजरंग मासाळ

पिंपरी: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने हैराण झालेले वाहनधारक, सीएनजीच्या दरातील चढ-उतार आणि या इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या देखभालीच्या खर्चाच्या वाढत्या भारामुळे पिंपरी-चिंचवडच्या वाहन बाजारातही ग्राहकांकडून इलेक्ट्रिक गाड्या खरेदीस मोठी पसंती मिळू लागली आहे. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक शहराच्या विविध भागांत तसेच पुणे, हिंजवडी, तळवडे, चाकण आणि तळेगावच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे कमी खर्चात दैनंदिन प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.

EV Vehicle
NigdI Chakan Metro: निगडी-चाकण मेट्रोसाठी भोसरीचा उड्डाण पूल पाडणार; १२,९३७ कोटींच्या सुधारित डीपीआरला वेग

कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, डिलिव्हरी कर्मचारी तसेच शहरात नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून ईव्हीचा विचार केला जात आहे. त्याचबरोबर प्रवासी आणि व्यावसायिक वापरातील इलेक्ट्रिक तीन चाकींचाही पर्याय पुढे येत आहे. चारचाकी वाहनांमध्येही ईव्हीबाबत ग्राहकांची उत्सुकता वाढली असून, वाहन खरेदी करताना पेट्रोल, सीएनजीसोबत इलेक्ट्रिक हा पर्यायही विचारात घेतला जात आहे.

EV Vehicle
Old Sangvi Water ATM: जुनी सांगवीत ‘वॉटर एटीएम’चा गोरखधंदा; शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

रोजच्या प्रवासाच्या खर्चाचा हिशेब

पिंपरी-चिंचवडसारख्या विस्तारणाऱ्या शहरात वाहन हा अनेक कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. घरापासून कार्यालय, उद्योग, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा किंवा पुणे शहराच्या दिशेने होणाऱ्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे वाहनाचा इंधन खर्च हा कुटुंबाच्या मासिक बजेटमधील महत्त्वाचा भाग आहे.

पेट्रोलच्या तुलनेत ईव्हीचा चालू खर्च कमी असल्याने अनेक वाहनधारक त्याचा विचार करत आहेत. घरच्या ठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल, तर दररोजच्या वापरासाठी इलेक्ट्रिक वाहन अधिक सोयीचे ठरत आहे. पारंपरिक इंजिनमधील अनेक यांत्रिक भाग ईव्हीमध्ये नसल्याने नियमित देखभालीचा खर्चही तुलनेने कमी होतो, असे ईव्ही वाहनचालकांचे मत आहे.

सोसायट्यांमध्ये गाड्या चार्जिंगचे आव्हान

ईव्हीचा वापर वाढत असला तरी शहरामध्ये चार्जिंग सुविधा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शहरातील अनेक नागरिक मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहतात. अशा ठिकाणी प्रत्येक वाहनधारकाला पार्किंगच्या जागेवर स्वतंत्र चार्जिंग सुविधा देणे, वीजपुरवठ्याची क्षमता वाढविणे आणि चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे ही सोसायट्यांसमोरील नवी गरज बनत आहे.

स्वतःच्या घरात पार्किंगची जागा आणि चार्जिंगची सुविधा असलेल्या वाहनधारकांसाठी ईव्हीचा वापर तुलनेने सोपा आहे. मात्र, सार्वजनिक पार्किंग, भाड्याच्या घरात राहणारे नागरिक किंवा निश्चित पार्किंगची सुविधा नसलेल्या वाहनधारकांसाठी चार्जिंगचे नियोजन अजूनही अडचणीचे असल्याने ईव्ही चार्जिंग स्टेशनवर अवलंबून रहावे लागत आहे.

EV Vehicle
Raksha Bandhan Rakhi Market: रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सजली; राख्यांच्या दरात २० टक्क्यांची वाढ!

पेट्रोल-सीएनजीला ईव्हीचा पर्याय

पेट्रोलनंतर कमी खर्चाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे अनेक नागरिक पसंती देतात. आता त्याच ग्राहकांसमोर इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाहन बाजारातील स्पर्धा आता पेट्रोल आणि डिझेलपुरती मर्यादित राहिलेली नाही. सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक अशा विविध पर्यायांमध्ये ग्राहक आपल्या गरजेनुसार वाहन निवडत आहेत.

औद्योगिकनगरीत ईव्हीला मोठी संधी

पिंपरी-चिंचवड हे मोठे औद्योगिक शहर असल्याने शहरातील उद्योग परिसर, आयटी पार्क, व्यापारी क्षेत्रे आणि निवासी भाग यांच्यात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास होतो. त्यामुळे कमी अंतराच्या नियमित प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहने उपयुक्त ठरत आहेत. विशेषतः डिलिव्हरी सेवा, कुरिअर, औद्योगिक परिसरातील कर्मचारी वाहतूक, स्थानिक व्यावसायिक वापर आणि दैनंदिन शहरांतर्गत प्रवासासाठी इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकींचा वापरही वाढला आहे. वाहनाचा रोजचा वापर जितका जास्त, तितका चालू खर्चातील फरक ग्राहकाला अधिक जाणवत आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरातील वाहनधारकांसाठी ईव्हीचा पर्याय दिसत आहे.

'रेंज'सोबत बॅटरीचीही चिंता

ईव्ही खरेदीचा निर्णय घेताना ग्राहक केवळ वाहनाची किंमत पाहत नाही. एका चार्जमध्ये वाहन किती अंतर धावते, चार्जिंगला किती वेळ लागतो, बॅटरीची वॉरंटी किती आहे, बॅटरी बदलण्याचा भविष्यातील खर्च किती असेल आणि शहरात सर्व्हिस सेंटरची सुविधा उपलब्ध आहे का, याबद्दलही वाहनचालक विचारणा करत आहेत.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वाहन वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये या ईव्ही वाहनांच्या रेंजबाबत साशंकता आहे. शहराबाहेर जाताना मार्गावर चार्जिंग स्टेशन मिळेल का, चार्जिंगसाठी किती वेळ थांबावे लागेल, याबाबत ग्राहकांना खात्री हवी आहे. त्यामुळे केवळ ईव्ही विक्री वाढविण्यापेक्षा चार्जिंगचे मजबूत नेटवर्क उभारणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना वाहनचालक करत आहेत.

EV Vehicle
Pavan Maval Crop Disease: पवन मावळात पिकांवर दुहेरी संकट; मररोगासह लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला

ईव्ही वाहने नोंदणी 2025-2026

  • मोटरसायकल/स्कूटर - 23,379

  • मोटारकार - 7,126

  • मालवाहू वाहन - 420

  • ई-रिक्षा विथ कार्ट (G) - 194

  • मोटार कॅब - 237

  • तीनचाकी (मालवाहू) - 112

  • तीनचाकी (प्रवासी) - 173

  • बस - 32

  • ई-रिक्षा (प्रवासी) - 24

  • तीनचाकी (वैयक्तिक)- 6

  • अनुकूलित वाहन - 11

  • कृषी ट्रॅक्टर - 1

  • फोर्कलिफ्ट - 1

  • आर्टिक्युलेटेड वाहन - 10

  • खासगी सेवा वाहन (वैयक्तिक वापर) - 1

  • एकूण - 31,727 वाहने

इलेक्ट्रिक वाहनांविषयी शहरवासीयांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढत आहे. इंधनावरील खर्च, दैनंदिन प्रवासाचा खर्च आणि वाहनाच्या वापराचा विचार करून अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत. नोंदणीतील वाढता कल वाहनचालकांच्या पसंतीत बदलाचे संकेत आहेत. नागरिकांचा हा बदलता कल भविष्यात शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्यास निश्चितच पूरक ठरेल.

राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

पूर्वी पेट्रोल आणि सीएनजीच्या खर्चाचा विचार करून गाडी चालवावी लागायची. ईव्ही घेतल्यानंतर रोजच्या प्रवासाचा खर्च तुलनेने कमी जाणवत आहे. शहरात नियमित ये-जा असते; तसेच सुरुवातीला चार्जिंग आणि रेंजची भीती होती; मात्र वापर केल्यानंतर त्याची सवय झाली. आता पुढची गाडी घेतानाही इलेक्ट्रिकचाच विचार करणार आहे.

करण केवारे, ईव्ही वाहनधारक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news