

सांगवी: शहरातील जुन्या सांगवी परिसरात सध्या आरोग्याचा मोठा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गलथान कारभारामुळे सांगवीकरांना आधीच अपुऱ्या आणि गढूळ पाण्याचा सामना करावा लागतो. नळाला तासनतास पाणी येत नाही आणि पाणी आले तरी ते गढूळ व पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशा हलाखीच्या परिस्थितीत नागरिक शुद्ध पाण्याच्या अपेक्षेने वॉटर एटीएमचा आधार घेत आहेत; परंतु या वॉटर एटीएमचे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी खरोखरच योग्य आहे का? यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जुन्या सांगवीत केवळ वॉटर एटीएमच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. या परिसरामध्ये तब्बल सात वॉटर एटीएम सुरू आहेत. मात्र, या एटीएममधून मिळणारे पाणी खरोखरच पिण्यायोग्य आहे का? या संपूर्ण प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असून, त्यांचा या गंभीर प्रकरणाकडे साफ कानाडोळा असल्याचे स्पष्ट होत आहे.
बोअरिंगच्या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका
सामान्यतः वॉटर एटीएमसाठी शुद्ध आणि योग्य पाणी वापरणे बंधनकारक असते. बोअरिंगच्या पाण्याचे योग्य पद्धतीने शुध्दीकरण करण्यासाठी ३५ ते ४० लाखांचा मोठा प्लँट लागतो; कारण बोअरिंगच्या पाण्याला दोन ते तीन वेळा फिल्टर करावे लागते. मात्र, येथील एटीएममध्ये सर्रास बोरिंगचे दूषित पाणी वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नफ्यासाठी दुकानदारांचा गोरखधंदा
या अनधिकृत प्रकारात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, काही दुकानदार ५० रुपयांचा ब्रँडेड जार विकत घेण्याऐवजी स्वतःच्या आर्थिक नफ्यासाठी या स्वस्त वॉटर एटीएममधून २० रुपयांना जार भरून घेऊन जातात. हेच असुरक्षित पाणी ते आपल्या दुकानात ग्राहकांना तब्बल ५० रुपयांना विकत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळला जात आहे.
कागदावरची कारवाई आणि नियम धाब्यावर
मोठ्या ब्रँडेड कंपन्यांचे मिनरल वॉटर प्लँट उभे करण्यासाठी ५० ते ६0 लाखांपर्यंतचा खर्च येतो आणि त्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मात्र, याउलट जुन्या सांगवीत अवघ्या ७० हजार रुपयांची साधी मशीन बसवून वॉटर एटीएम चालवले जात असल्याचे बाेलले जात आहे. या एटीएम चालकांकडे कसलेही अधिकृत परवाना नाही. तसेच, पाण्याविषयीचा लॅब रिपोर्ट (प्रयोगशाळा अहवाल) किंवा टीडीएस रिपोर्ट उपलब्ध नाही. पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या आणि अन्न व औषध विभागाच्या परवानग्या कागदावरच आहेत. प्रशासनाकडून केवळ कारवाई करणार असे आश्वासने दिले जाते. प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य असून, सर्व काही कागदावरच सुरू असल्याचे दिसत आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर
जुन्या सांगवीतील बुद्धकोश सोसायटी, शितोळेनगर, माखन चौक, मुळानगर झोपडपट्टी, पवारनगर, ढोरेनगर या परिसरामध्ये या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. एका स्थानिकाच्या माहितीनुसार, या वॉटर एटीएमचे पाणी प्यायल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तीव्र ॲसिडिटीचा त्रास झाला. तसेच, ८ ते १० दिवस फूड पॉइजनिंगचा सामना करावा लागला असून, लहान मुलांनादेखील याच दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन लवकरच वॉटर एटीएमबद्दल गाईडलाईन (मार्गदर्शक तत्त्वे) तयार करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
कारवाईची मागणी
दुसरीकडे, नळाचे गढूळ पाणी आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाइलाजाने या वॉटर एटीएमचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, या पाण्याची आणि यंत्रणेची देखभाल करण्याची मुख्य जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची असतानाही त्यांचे या अत्यंत महत्त्वाच्या समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. तसेच, स्थानिक वॉटर असोसिएशनचेही या प्रकारावर म्हणावं तसे नियंत्रण राहिलेले नाही. फक्त ७० हजार रुपयांच्या मशीनच्या मोहात आणि नफ्यापोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अनधिकृत वॉटर एटीएमवर महापालिका आणि एफडीए कधी ठोस कारवाई करणार? असा संतप्त सवाल जुनी सांगवीतील नागरिक विचारत आहेत.
या वॉटर एटीएममधील पाणी प्यायल्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला तीव्र ॲसिडिटी आणि ८ ते १० दिवस गंभीर फूड पॉइजनिंगचा त्रास झाला, ज्याचा फटका लहान मुलांनाही बसला आहे.
स्थानिक नागरिक
आतापर्यंत आमच्याकडे वॉटर एटीएमच्या परवानगीसाठी कुणीही आलेले नाही. त्यामुळे महापालिकेकडे याची कोणतीही अधिकृत नोंद नाही. आम्ही या प्रकरणाची तातडीने पाहणी करू आणि लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.
पूजा दुधनाळे, क्षेत्रीय अधिकारी ह कार्यालय