

मिलिंद कांबळे
पिंपरी: राज्यात श्रीमंत असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल अठरा अधिकारी व कर्मचार्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झाली आहे. ते सर्व गजाआड जाऊन आले आहेत.
असे असले तरी, लाचखोरीचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे नगरसेवकांसह, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
महापालिकेत प्रत्येक कामासाठी पैश्याची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे. शिपायापासून अधिकार्यांपर्यंत सर्वांची टक्केवारी ठरलेली असल्याचे बाेलले जात आहे. खिसा गरम झाल्यानंतरच फाईल वेगात फिरते; अन्यथा फाईल काही जागची हलत नाही. याला काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी अपवाद आहेत.
सन एप्रिल 2017 ते 29 ऑक्टोबर 2026 या नऊ वर्षांच्या कालावधीत तब्बल 18 अधिकारी व कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. त्या प्रकरणात ते सर्व जण तुरुंगाची वारी करून आले आहेत. अद्याप काही अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी सुरू आहे, तर काही जण निर्दोष सुटले असून, ते पुन्हा महापालिकेत रूजू झाले आहेत.
ठेकेदार, नागरिक वैतागले
अटक होण्याचे प्रकार सतत घडत असतानाही महापालिकेच्या कामासाठी लाच घेण्याचे प्रकार काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. खुलेआम पैसे मागण्याचे प्रकार कायम आहेत. काही अधिकारी स्वत: लाच घेतात, तर काहींनी त्यासाठी खास माणसाची नियुक्ती केली आहे.
टक्केवारी मिळाल्यानंतर फाईल पुढे हलत असल्याचे चित्र आहे. लाचखोरीच्या या वाढत्या प्रकारामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते वैतागले आहेत.
प्रशासकीय राजवटीत लाचखोरीचा कळस ?
मुदतीमध्ये निवडणुका न झाल्याने महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. दुसर्या दिवसापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. ती 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू होती.
नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवटीत अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनमर्जी कारभार सुरू होता. त्या काळात लाचखोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात बोकाळला. या चार वर्षांत तब्बल सहा अधिकारी व कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले हेते. अद्याप काही अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय राजवटीतून बाहेर आलेले नाहीत. हेकेखोर व निर्ढावलेल्या अधिकार्यांमुळे महापालिकेच प्रतिमा ढागळली जात असल्याचे आरोप महापालिका सभेत वारंवार केला जात आहे.
लाचखोरीत स्वीय सहाय्यकापासून मुख्याध्यापक, मुख्य अभियंत्यांचा समावेश
महापालिकेत गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत लाचखोरीचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. त्यात आयुक्तांचा स्वीय सहाय्यकापासून, बीट निरीक्षक, मुख्याध्यापक, सर्व्हेअर, लिपिक, मुख्य अभियंता यांचा समावेश आहे.
मुख्याध्यापिका अलका कांबळे आणि लिपिक बाबासाहेब राठोड यांना कॅण्टीन चालवण्यास देण्याच्या कामासाठी लाच स्वीकारताना 3 एप्रिल 2017 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती.
तत्कालीन आयुक्तांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिर्के यांना 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना 2 मे 2017 ला अटक करण्यात आली होती. महापालिकेचे कर्मचारी तानाजी दाते, किशोर शिंदे, प्रकाश रोहकले, अमोल वाघेरे, उदय वानखेडे, अनिल माने, नगर रचना विभागाचा सर्व्हेअर संदीप लबडे, पाणीपुरवठा विभागाचा अनुरेखक दिलीप आडे, सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे, उपलेखापाल संजय काळभोर, विकास गव्हाणे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तथा बीट निरीक्षक उमेश लोंढ आणि करसंकलन विभागचा लिपिक उमेश कुटे यांना वेगवेगळा प्रकरणात लाच स्वीकारताना अटक झाली आहे. त्यांना महापालिकेने निलंबन केले आहे.
पैशांची मागणी केल्याने भाजप नगरसेवकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव
बांधकाम परवानगी देण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून दुप्पट शुल्काची मागणी करण्यात आली. त्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी तक्रार केली होती. त्यात प्रकरणात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे यांचे सेवानिलंबन केले. ही कारवाई 11 सप्टेंबर 2026 ला करण्यात आली होती.
नऊ महिन्यांत तीन जण जाळ्यात
महापालिकेत भाजपची सत्ता दुसर्यांदा आली आहे. भाजपकडून महापालिकेचा कारभार सहा फेब्रुवारी 2026 पासून सुरू आहे. सत्ताधार्यांच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तीन अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात सापडले आहेत. त्यात मुख्य अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि करसंकलन विभाग लिपिकाचा समावेश आहे.
लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी महापालिकेशी संबंधित काम करण्यासाठी लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधिक्षक नीता मिसाळ यांनी केले आहे. तक्रार देण्यासाठी (020) 26132802 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 9403781064 या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.