

पिंपरी: दिल्ली, मुंबई, पुणेपाठोपाठ औद्योगिकनगरी असलेले पिंपरी-चिंचवड हे हवेच्या खराब गुणवत्तेत पुढे जात आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी ही 0 ते 50 असायला पाहिजे; परंतु ती सध्या 300 च्या पुढे गेली आहे. काही ठिकाणी जाळण्यात येणारे प्लास्टिक आणि कचरा यातून निर्माण होणाऱ्या धूर भर टाकत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विचार करता खराब रस्ते, बांधकाम, औद्योगिक आणि शहरी कचरा जाळण्याचे प्रकार व त्यातच कमी झालेले हरितक्षेत्र व ढासळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहरवासीयांचा श्वास कोंडत आहे. हिवाळा असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. शहरावर धुक्याची दाट झालर पसरली जात आहे. त्यात शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. हिंजवडी आणि वाकडसारख्या भागात सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक 250 - 300 पेक्षा अधिक नोंदविला जात आहे. मात्र, हवा शुध्द करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. त्या यंत्रणा देखील फोल ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक 50 पर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक प्रदूषण वाढल्यास त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. शहरातील काही भागात मागील काही दिवसात सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 300 च्या पुढे जवळपास नोंदवला गेला. खराब श्रेणीत पोहोचलेली शहराची हवा शहरवासीयांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करत आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोका वाढत आहे. तसेच, अस्थमा, सीओपीडी, इतर फुप्फुसांच्या विकार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होतो. पर्यावरण प्रेमींकडून हवा प्रदूषण कमी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचा आरोप होत आहे.
हवा प्रदूषणाची कारणे
पालिकेच्या रस्ते साफ करताना उडवली जाणारी धूळ.
पर्यायी व्यवस्था नसल्याने जळाला जाणारा औद्योगिक कचरा.
शहरात कार्यरत असणारे आरएमसी प्लांट.
अनियंत्रित बांधकाम.
वारंवार खोदले जाणारे.
रस्ते सार्वजनिक वाहतुकीचा उडालेला बोजवारा.
अधिक प्रदूषण करणारे शहरातील कारखाने.
रस्त्याच्या कडेला जाळला जाणारा कचरा.
काम न करणारे ठेकेदार.
आम्ही आजपर्यंत सांगितलेली प्रदूषणाची कारणे व त्यावरील उपाययोजना हे पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी जाणून घेतले असते, तर शहराची हवा शुद्धीकरणासाठी वेगळे 75 लाख खर्च करायची गरज पडली नसती. समस्या निर्माण करून त्याचा अभ्यास करण्यासाठी खर्च केला जातो. मग फक्त नावाला दाखवण्यासाठी उपाययोजनांवर खर्च केला जातो. सद्यस्थितीला पिंपरी-चिंचवड राज्यात सगळ्यात प्रदूषित शहर का झाले हे फक्त अभ्यास करण्यासाठी 75 लाख रुपये खर्च होणार आहेत.
प्रशांत राऊळ (पर्यावरणप्रेमी)