Pimple Gurav Smart City Bus Stop Issue: पिंपळे गुरव स्मार्ट सिटी बसथांब्यावर तुटलेला बाक; कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
पिंपळे गुरव: पिंपळे गुरव परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पीएमपीएमएलचे आधुनिक बस थांबे उभारण्यात आले असून, यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रवाशांना सुरक्षित आरामदायी व दर्जेदार सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हे बसथांबे उभारले गेले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतरही कल्पतरू सोसायटीजवळील बसथांब्यावर बसवण्यात आलेला कडाप्प्याची आसन व्यवस्था अल्पावधीतच तुटलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लाखो रुपयांचा खर्च नेमका कोणासाठी असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीजवळील अत्यंत महत्त्वाच्या बस थांब्यावर बसविण्यात आलेल्या नव्या बाकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दररोज शेकडो प्रवासी या थांब्यावरून प्रवास करत असताना बसण्यासाठी ठेवलेला कडाप्याचा बाक तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाक वापरण्यायोग्य नसल्यामुळे प्रवाशांना उभे राहूनच बसची वाट पाहावी लागत असून, ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिकच गैरसोयीची ठरत आहे.
कल्पतरू सोसायटी परिसर हा दाट लोकवस्तीचा भाग असून, येथून पीएमपीएमएलच्या अनेक बस मार्गांची नियमित ये-जा असते. भोसरी-माळुंगे भोसरी- भेकराईनगर भोसरी-कोथरूड आदी मार्गांवरील बसेस या थांब्यावर थांबत असल्याने हा बसथांबा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेत या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते.
अशा वर्दळीच्या बसथांब्यावर मूलभूत सुविधांची ही दुरवस्था पाहता प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तुटलेल्या बाकामुळे बस थांब्याचे विदारक चित्र दिसून येत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तात्काळ या बसथांब्याची पाहणी करून तुटलेला बाक दुरुस्त करावा तसेच प्रवाशांसाठी मजबूत व टिकाऊ बाकांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पीएमपीएमएलकडून दुरुस्तीची कार्यवाही न झाल्यास कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी पाठवून पाहणी करण्यात येईल. पाहणीनंतर आवश्यक त्या दुरुस्तीचे काम करून घेतले जाईल.
प्रसाद देशमुख, उपाभियंता, ड क्षेत्रीय कार्यालय, मनपा.
कोट्यवधी रुपये खर्चून महापालिका अनेक योजना राबवत असते. मात्र, त्याची देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येते. कल्पतरू थांब्यावरील बाकांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
स्थानिक

