

वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायत निवडणुकीत वडगावकर मतदारांनी एकूण 17 पैकी 12 नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, 5 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर माजी नगराध्यक्षांसह 5 माजी नगरसेवकांना या निवडणुकीत मतदारांनी नाकारले आहे.
नगरपंचायत निवडणुकीच्या रविवारी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर झालेल्या निकालानुसार, वडगाव नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग््रेासकडे अबाधित राहिले असून, नगरसेवक पदाच्या एकूण 17 जागांपैकी 9 राष्ट्रवादी काँग््रेास, 6 भाजप व 2 अपक्ष असे पक्षीय बलाबल निर्माण झाले आहे.
त्यामुळे नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आल्याचे स्पष्ट झाले आहे. नवनिर्वाचित 17 नगरसेवकांमध्ये वडगावकर मतदारांनी राष्ट्रवादी काँग््रेासच्या पूनम भोसले, सुनीता ढोरे, अजय भवार, आकांक्षा वाघवले, अजय म्हाळसकर, वैशाली सोनवणे तर भाजपचे रोहित धडवले, विशाल वहिले, अनंता कुडे, राणी म्हाळसकर व अपक्ष रूपाली ढोरे, सारिका चव्हाण या 12 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच गेल्या पंचवार्षिकमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले भाजपचे दिनेश ढोरे, अर्चना म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या माया चव्हाण यांच्यासह स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलेले राष्ट्रवादीचे सुनील ढोरे व गणेश म्हाळसकर या 5 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
तसेच या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावणारे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, भाजपचे माजी नगरसेवक किरण म्हाळसकर, दीपाली मोरे व मनसेच्या माजी नगरसेविका सायली म्हाळसकर या 5 जणांना वडगावकर मतदारांनी नाकारले आहे. याशिवाय विजयी उमेदवारांमध्ये माजी नगरसेवक राहुल ढोरे यांच्या पत्नी सुनीता ढोरे व माजी नगरसेविका पूजा वहिले यांचे पती विशाल वहिले यांना संधी मिळाली आहे. तर माजी नगरसेवक प्रवीण चव्हाण यांच्या पत्नी सुप्रिया चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला आहे. एकंदर या निवडणुकीत मातब्बरांना धक्का देत नव्या जुन्या चेहऱ्यांना वडगावकरांनी संधी दिली असल्याचे दिसते.
भाजपच्या 5 तर राष्ट्रवादीच्या 4 बालेकिल्ल्यांना खिंडार!
वडगाव शहरातील भाजपचे बालेकिल्ले किंवा गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्ता असलेल्या प्रभाग 1, 11, 12, 13 व प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीने खिंडार पाडले आहे. तर राष्ट्रवादीच्या ताब्यात व बालेकिल्ले असलेल्या प्रभाग 3, 6 व प्रभाग 15 मध्ये भाजपने खिंडार पाडले असून, राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या प्रभाग 5 मध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. मनसेच्या ताब्यात असलेल्या प्रभाग 16 मध्ये भाजपने बाजी मारली आहे.
भाजपला 2 तर राष्ट्रवादीला 4 बालेकिल्ले राखण्यात यश!
या चुरशीच्या निवडणुकीत एकमेकांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत असताना भाजपला प्रभाग 2 व प्रभाग 17 या अवघ्या दोन प्रभागांत बालेकिल्ला राखता आला आहे. तर राष्ट्रवादीला प्रभाग 4, 7, 8 व प्रभाग 10 या चार प्रभागात सत्ता राखण्यात यश आले आहे.