

पिंपळे गुरव: ओंकार कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावर चेंबरचे झाकण तुटून आत गेल्यामुळे वाहनचालक आणि पादचारी यांना गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर नेहमीच दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यातच पुढे शाळा असल्याने सकाळी व दुपारी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या तुटलेल्या चेंबरमुळे केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. (Latest Pimpri chinchwad News)
प्रशासनाचे दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी सांगितले, की सुमारे आठ दिवसांपूर्वी आम्ही या तुटलेल्या चेंबरबाबत संबंधित प्रशासनाला माहिती दिली होती. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन तात्पुरते झाकण बसवले, परंतु ते नीट न बसवल्यामुळे काही दिवसांतच पुन्हा झाकण आत गेले आणि त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला. या खड्ड्यामुळे वाहन चालकांना तोल सांभाळणे अवघड झाले असून, विशेषतः दुचाकीस्वारांना त्या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्यावेळी अंधार असल्याने तसेच सध्या पाऊस सुरू असल्याने चेंबरवर पाणी साचून हे चेंबर लक्षात येत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
चेंबरच्या दुरुस्तीची मागणी
अपघाताचा धोका लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेत तुटलेल्या चेंबरमध्ये उसाचे चिपाड लावून वाहनचालकांना सावध केले आहे. त्यामुळे सध्या नागरिकच नागरिकांची काळजी घेताना दिसत आहेत. प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नागरिकांनी सांगितले, की महापालिका अधिकारी केवळ तात्पुरते उपाय करतात; पण कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करतात. आम्ही वारंवार तक्रारी केल्या तरी काहीच प्रतिसाद मिळत नाही. अशा निष्काळजीपणामुळे एखादा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांनी संबंधित विभागाला तातडीने चेंबरचे झाकण बदलून रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच, शाळेजवळ आणि गर्दीच्या रस्त्यांवरील अशा धोकादायक ठिकाणांची तात्काळ पाहणी करुन सर्व चेंबर व्यवस्थित बसवण्याची मागणी केली आहे.
ओंकार कॉलनी परिसरातील तुटलेल्या चेंबरबाबत त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवून पाहणी केली जाइल. नवीन व मजबूत चेंबरचे झाकण बसवून लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल
प्रसाद देशमुख, उपअभियंता, ड स्थापत्य विभाग
रस्त्याच्याकडेला दुकाने आहेत. दररोज नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. एखादा पादचारी किंवा वाहनचालक या खड्ड्यात पडला तर मोठी दुर्घटना घडू शकते. महापालिकेने फक्त तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी झाकण बसवावे.
विश्वास कांतोडे, स्थानिक नागरिक