

पिंपरी: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांमध्ये कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. घरातून निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी व घातक अशा चार प्रकारात वेगवेगळा करून घंटागाडीला देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. विविध परिसरांमध्ये जनजागृती उपक्रम व नागरिकांशी थेट संवाद साधून कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करून देणे आवश्यक आहे. ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा तसेच, घातक कचरा स्वतंत्रपणे जमा केल्यास त्यावर प्रक्रिया करणे सुलभ होते.
यामुळे पुनर्वापराला चालना मिळते, कचरा प्रक्रिया अधिक परिणामकारक होते. मोशी कचरा डेपोतील लॅण्ड फिल्डवर जाणार्या कचर्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होते, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात येत आहे. जनजागृती अभियानाला शहरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
नागरिकांनी कचरा वेगवेगळा करून द्यावा
नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे. ओला, सुका, सॅनिटरी व घातक कचरा नागरिकांनी स्वतंत्रपणे दिल्यास कचराप्रक्रियेला गती मिळते, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.