

पिंपरी: रुग्णालयातील रुग्णसेवेसाठी देशातील मानवी विकास निर्देशांक उच्च स्थानावर नेणाऱ्या आरोग्य निर्देशांक सुधारण्यामध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णालयात चांगली व परिणामकारक रुग्णसेवा देण्यासाठी महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या शिफारशीनुसार परिचारिकांचे प्रमाण 1 : 6 असे असणे आवश्यक आहे. सध्या हे प्रमाण 1 : 40 इतके आहे. याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.
सध्या रुग्णालयात परिचारिकांची संख्या अपुरी आहे. त्यास भरती प्रक्रियेची अनास्था, स्थलांतर, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता आदी कारणे जबाबदार आहेत. देशात ग््राामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे काम करण्यासाठी हजारो परिचारिकांची गरज आहे. खासगी रुग्णालयामध्ये प्रशिक्षित परिचारिकांचे प्रमाण कमी आहे.
त्यास किमान वेतन कायदा नसल्यामुळे अपुरे वेतन, कामाचे अमर्यादित तास, मानसिक तणाव आदी कारणे आहेत. सध्या बऱ्याच शासकीय रुग्णालयामध्ये परिचारिकांची संख्या कमी असल्यामुळे परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. शासकीय रुग्णालयात वरिष्ठ परिचारिकांना प्रतिमहा कमाल वेतन 80 हजारांहून अधिक मिळते. तर खासगी रुग्णालयात परिचारिकांना 15 ते 20 हजार प्रतिमाह वेतन मिळते.
भारतीय परिचर्या परिषदेने किमान 30 हजार रुपये प्रतिमाह ही शिफारस केली आहे. याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. भारतीस परिचर्या परिषदेच्या शिफारशीनुसार 50 ते 100 बेडेड खासगी रुग्णालयात शासकीय वेतनाच्या 25 टक्केपेक्षा कमी तफावत असू नये. तसेच 100 ते 200 बेडेड खासगी रुग्णालयात 10 टक्केपेक्षा कमी तफावत आहे.
इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या मानांकनाप्रमाणे 6 रुग्णांमागे 1 परिचारिका असे प्रमाण पाहिजे. सध्या 50 ते 60 रुग्णांमागे 2 परिचारिका काम करतात. एखादवेळी वॉर्डमध्ये 70 ते 80 रुग्ण असतात. म्हणजे 40 रुग्णांमागे 1 परिचारिका काम करते इतकी तफावत आहे. त्यामुळे परिचारिकांवर कामाचा खूप ताण येतो. यासाठी रिक्त पदे भरली पाहिजेत. आयसीयूसारख्या ठिकाणी एका रुग्णांला एक परिचारिका पाहिजे. त्याठिकाणी दहा रुग्णांमागे दोन परिचारिका असतात.
इंदूमती थोरात (अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य नर्सेस फेडरेशन)