

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार (दि. 15) जानेवारीला मतदान होणार असून, मंगळवार (दि. 13) जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार संपला. दरम्यान, गेल्या महिनाभरात आचारसंहिता उल्लंघनच्या जवळपास 56 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 53 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी केवळ 24 तक्रारी होत्या. मात्र, निवडणुकीची तारीख जशी जवळ येत गेली तसे तक्रारीत वाढ झाली.
महापालिकेची निवडणूक प्रक्रिया शुक्रवार (दि. 16) रोजी संपत आहे. 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर सोमवार (दि. 12) पर्यंत जवळपास 56 तक्रारी आल्या. त्यापैकी 53 तक्रारी निकाली काढण्यात आल्या, तर तीन तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे. विशेष म्हणजे ई प्रभागात अद्याप एकही तक्रार प्राप्त झालेली नाही.
प्रभागात पैसे वाटप होणे, वस्तू अथवा भेटवस्तू देणे, प्रचारासाठी जेवण अथवा अमिष देणे, विनापरवाना बोर्ड, बॅनर उभा करणे यासह नेमून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी आठ क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नेमून दिले आहेत. त्यातील सर्वाधिक तक्रारी या क प्रभागात होत्या. तर, सर्वात कमी तक्रारी या ह प्रभागातून दाखल झाल्या. तर, इतर ठिकाणांहून 5 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील काही तक्रारी गेल्या असून, त्यांच्यामार्फत महापालिकेकडे त्या वर्ग केल्या आहेत.
पाच दखलपात्र, तर आठ जणांवर अदखलपात्र गुन्हे
निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार, चिखली, एमआयडीसी भोसरी, काळेवाडी, पिंपरी या पोलिस ठाण्यात संबंधित प्रभागातील उमेदवार अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, आठ जणांवर अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.