

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी, इंद्रायणीनगर, मोशी या सकाळच्या टप्प्यात मतदानाचा टक्का कमी होता. तो दुपारी दीड वाजेपर्यंत वाढला नव्हता. अखेर उमेदवारांमध्ये कुठे धाकधूक तर, कुठे दिलासा असे वातावरण दिसून आले.
आपल्या प्रभागात, बालेकिल्ल्यातील मतदानाचा आकडा कमी झाल्याने काही उमेदवार घायकुतीस आले होते. आपल्या कार्यकर्त्यांकडून वारंवार प्रभागातील अपडेट घेत होते. तर, दुसरीकडे आपल्या पसिरातील मतदानाचा टक्का वाढताना पाहिल्यावर उमेदवारांच्या चेहऱ्यावर हसू आले.
भोसरी विधानसभा अंतर्गत असलेल्या केंद्रात सकाळीच्या टप्प्यात मतदारांमध्ये निरत्साह होता. बहुतांश केंद्रावरील मतदानांची आकडेवारी ही सरासरी 5 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान होती. परिणामी, उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली होती. तर, काही तास थांबूनही हा आकडा वाढत नसल्याने उमेदवार घामेघूम झाले. अखेर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ते केंद्राकडे मतदार यावेत, यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागली.
दरम्यान, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत महापालिकेच्या निवडणूक विभागाने आकडा जाहिर केला. त्या आधारावर उमेदवारांकडून टक्केवारीचे गणिते होऊ लागली आहेत. भोसरीतील प्रभाग 3 आणि 4 या परिसरातील काही केंद्रावर अतिशय कमी टक्क्क्याचे मतदान झाले. त्यापैकी इंद्रायणीनगर येथील रवी शंकर विद्यामंदिर येथे तर सकाळपासून अतिशय तुरळक गर्दी असल्याने या प्रभागातील कमी झालेले मतदान नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत दोन्ही उमेदवारांकडून गणिते मांडणे सुरु होते.
दुपारनंतर उमेदवार गायब
मतदानाच्या दिवशी भल्या सकाळीच उमेदवार हे आपल्या प्रभागातील विविध केंद्रावर भेटी देत होते. पण, आपल्या बालेकिल्ल्यात, राहत असलेल्या परिसरात मतदानाचा टक्का घसरल्याने उमदेवार गडबडून गेले. दुपारी साडेतीन वाजता मतदानाचा आकडा बाहेर आल्यानंतर अनेक उमेदवार हे केंद्रातून गायब झाले. तर, काही उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या परिसरातील केंद्रात थांबून होते.