

PCMC Compactor Tender Inflated from ₹6 Crore to ₹9.53 Crore
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून कागदपत्रे व फाईली सुस्थितीत ठेवण्यासाठी सहा कोटी रुपयांची मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. हे काम एकाच ठेकेदार कंपनीला डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आले. ती सहा कोटींची निविदा तब्बल 9 कोटी 53 लाख 74 हजार 232 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भांडार विभागाच्या या अजब कारभाराची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
भांडार विभागाने सहा कोटी सहा लाख रुपयांची कॉम्पॅक्टर रॅकचा साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ई निविदा 2 एप्रिलला प्रसिद्ध केली. त्यामध्ये चार पुरवठादार पात्र झाले. त्यापैकी इंद्रनिल टेक्नॉलॉजीजचे 5 कोटी 86 लाख 9 हजार 145 रुपये दराच्या निविदेस स्थायी समितीने मान्यता दिली. (Latest Pimpri News)
कॉम्पॅक्टर रॅक खरेदीत गुणवत्ता व पारदर्शकता बाजूला ठेवून एकाच ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदाप्रक्रिया राबविली. त्याच ठेकेदाराला निविदा प्रक्रियेत काम देण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
महापालिकेच्या जास्तीत जास्त विभागांसाठी एकाच ठिकाणी अभिलेख कक्ष कार्यान्वित करण्यासाठी नेहरुनगर येथील नवीन इमारतीत दुसरा व तिसरा मजल्यावर अभिलेख कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथील जागा वाढल्याचे कारण देत मंजूर दराने एकूण 9 कोटी 53 लाख 74 हजार 232 रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच पुरवठा आदेश त्या ठेकेदाराला देण्यात आले आहेत. त्यामुळे या खरेदीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक म्हणजे काय?
मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक म्हणजे जागा वाचवणारे एक खास प्रकारचे कपाट किंवा रॅक. ते एका ठिकाणी दुसरीकडे सरकवता येतात, ज्यामुळे कमी जागेत जास्त सामान ठेवता येते. हे रॅक साधारणपणे कार्यालये, ग्रंथालये किंवा इतर ठिकाणी जिथे जास्त सामान असते तिथे वापरले जातात. त्यात कागदपत्रे, फाईली, रजिस्टर, पुस्तके व इतर साहित्य ठेवले जाते.
आवश्यकता असल्याने नियमानुसार खरेदी
मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक खरेदीची भांडार विभागाने निविदाप्रक्रिया राबविली आहे. सुमारे 6 कोटी रुपयाची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, एकाच ठिकाणी सर्व विभागांची कागदपत्रे व फाईली ठेवण्यासाठी रॅक करण्यात येत असल्याने निविदेतील मंजूर दराने 9 कोटी 53 लाख रुपयाचा पुरवठा आदेश देण्यात आला आहे, असे महापालिकेचे मध्यवर्ती भांडार विभागाचे उपायुक्त नीलेश भदाणे यांनी सांगितले.