

Child Helpline in School Textbooks
पिंपरी: दिवसेंदिवस बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत शालेय विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकात चाईल्ड हेल्पलाइन नंबरचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
काय आहे 1098?
1098 हा बालहक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या चाईल्डलाइन इंडिया फाउंडेशन या संस्थेचा मोफत टोल फ्री क्रमांक आहे. हा क्रमांक संपूर्ण दिवस व रात्र कार्यरत असतो आणि भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करतो. हा क्रमांक 18 वर्षांखालील सर्व बालक आणि बालिकांसाठी उपलब्ध आहे. बालविवाह, बालमजुरी, शारीरिक, मानसिक अत्याचार, उपेक्षा, विस्थापन, बेपत्ता होणे किंवा इतर संकटग्रस्त स्थितीत असलेल्या कोणत्याही मुलासाठी या क्रमांकावर त्वरित मदत मिळू शकते. (Latest Pimpri News)
...असे चालणार काम
विद्यार्थ्यांनी 1098 या चाईल्ड हेल्पलाइन नंबरवर फोन केला, तर प्रशिक्षित समुपदेशक संबंधित बालकाशी संवाद साधतो. बालकांची माहिती गोपनीय ठेवली जाते. तातडीने मदतीसाठी स्थानिक अधिकार्यांशी संपर्क साधला जातो. गरजेनुसार पोलिस, बालकल्याण समिती किंवा सामाजिक कार्यकर्ते मदतीला जातात.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल
पहिलीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलण्यात आला आहे. यात बाललैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाइन नंबर (1098) समाविष्ट करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात अखेरच्या पानाच्या आतील भागात हेल्पलाइनचा उल्लेख करण्यात आला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल उच्च शिक्षणासह शालेय स्तरावरही करण्यात आले आहेत. शालेय शिक्षणापासूनच मुलांना सक्षम करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत शालेय विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी पाठ्यपुस्तकात चाईल्ड हेल्पलाइन नंबरचा समावेश करण्यात आला आहे.- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग
अत्याचार घडल्यानंतर मुलांना कोणाला सांगावे कळत नाही. या हेल्पलाईनची मदत घेतल्यानंतर मुलांच्या समस्येचे निराकरण होणार आहे. बाल हक्क संरक्षण कायद्यांतर्गत मुलांच्या सुरक्षेसाठी हा नंबर दिला आहे. जेवढा जास्तीत जास्त नंबरचा प्रसार होईल तेवढी जनजागृती होईल.
- संगीता निंबाळकर, राज्य समुपदेशक
पाठ्यपुस्तकांत हेल्पलाइन क्रमांकाचा समावेश करणे, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. संकटसमयी काय करायचे, याची माहिती मिळू शकणार आहे. बालकांवरील अत्याचार कमी करण्यासाठी हे मोठे पाऊल आहे.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग