Pimpri News: कुटुंबीयांना सांगितले लंडनमध्ये असल्याचे; गहुंजेतील बंद फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

बँक व्यवहारावरून पोलिसांनी शोधला ठावठिकाणा
Pimpri News
Pimpri NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: कुटुंबीयांना लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याचे सांगणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह गहुंजे येथील आलिशान सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला.

विशेष म्हणजे, संबंधित महिला ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ब्रिटनमधून भारतात परतल्याचे नोंदीतून समोर आले आहे. बुधवारी (दि. २८) रात्री लोढा बेलमोंडो सोसायटीत हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Pimpri News
Dry Fruits Price Increase: दिवाळीपूर्वी ड्रायफ्रूट महागले; बदाम-पिस्त्याच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ

मुग्धा अविनाश देशमुख (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांच्या मुलगी आहेत. मुग्धा लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याची त्यांच्या कुटुंबीयांची समजूत होती, मात्र २३ ऑक्टोबर रोजी आईशी फोनवर बोलल्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. त्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांची मदत घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धा यांच्या शोधादरम्यान इमिग्रेशन नोंदी तपासल्या असता त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ब्रिटन सोडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील ऑनलाइन व्यवहार आणि खाद्यपदार्थांच्या ऑर्डरची माहिती तपासण्यात आली.

या तांत्रिक तपासातून त्या गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत असल्याचा माग लागला. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री संबंधित फ्लॅट गाठला. फ्लॅटचा दरवाजा बंद असल्याने तो तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. त्या वेळी बेडरूममध्ये मुग्धा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

Pimpri News
Maval Drought Situation: मावळच्या दुष्काळी पाहणीआधीच श्रेयवाद रंगला; नेते पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर!

प्राथमिक अंदाजानुसार, मुग्धा यांचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या भारतात नेमक्या कधी परतल्या, पुण्यात कोणाच्या संपर्कात होत्या, गहुंजे येथील फ्लॅटमध्ये कशासाठी राहत होत्या आणि त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ऑगस्टच्या अखेरीसच ब्रिटनमधून आल्या होत्या भारतात

मुग्धा देशमुख या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र त्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ब्रिटनमधून बाहेर पडल्या होत्या. भारतात परतल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती का दिली नाही?, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यातच २३ ऑक्टोबरनंतर त्यांचा संपर्क तुटला आणि अवघ्या काही दिवसांत गहुंजेतील बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.

ऑनलाइन फूड ऑर्डरमुळे लागला शोध

मुग्धा यांचा संपर्क तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यांच्या बँक खात्यातील ऑनलाइन व्यवहारांसह खाद्यपदार्थांच्या ऑर्डरची माहिती तपासली. या डिजिटल व्यवहारांच्या आधारे पोलिसांना गहुंजे येथील फ्लॅटचा माग काढण्यात यश आले, मात्र पोलिस तेथे पोहोचेपर्यंत मुग्धा यांचा मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.