पिंपरी/पुणे: वैष्णवी हगवणे हिचा जगण्याचा हक्क हिरावणार्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल, असा शब्द मी तिच्या आई-वडिलांना दिला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदना वैष्णवी यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला घ्यावा, असा निर्णय देखील शासनाने घेतला आहे, अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंडे यांनी पिंपरी-चिंचवड येथे वैष्णवी यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले, त्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या की, वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यापासून महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा आहे. (Latest Pune News)
सर्वसामान्य माणसांचे मन विषण्ण झाले आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांचे सांत्वन करायला मी आले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीसुद्धा चर्चा झाली आहे.
वैष्णवीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार वैष्णवीबाबत अन्याय झालेला आहे, असे दिसत आहे. ज्यांनी कोणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे, त्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल, असा शब्द मी तिच्या आई-वडिलांना दिलेला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर मी आत्ता कोणतीही टिप्पणी करणार नाही, असे स्पष्ट करून पंकजा मुंडे म्हणाल्या खई, जे आरोपी आहेत, ते अटक झालेले आहेथ. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, तपास सुरू आहे. या विषयावर प्रत्येक अधिकारी अत्यंत निष्पक्षपाती चौकशी करेल, याची पूर्ण दखल मुख्यमंत्री घेतील. वैष्णवीच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणार्यांना न्यायालयीन सर्वोच्च शिक्षा झाली पाहिजे, अशी तिच्या आई-वडिलांची मागणी आहे.