

सरासरी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो
सरासरी वेळेच्या आठ दिवस आधीच दाखल
पोषक वातावरणामुळे येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार
पुणे : मान्सूनला प्रगती करण्यास पोषक वातावरण मिळाल्यामुळे शनिवारी (दि.24 )मान्सूनने केरळच्या किनारपट्टीवर धडक मारली. दरम्यान मान्सून वेगाने प्रगती असून, येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा पोषक स्थितीमुळे 13 मे रोजीच मान्सून अंदमान,निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला होता. वास्तविक पाहता एरवी मान्सून 20 ते 25 मे च्या दरम्यान दाखल होत असतो. मात्र यंदा तो तेरा दिवस आधीच दाखल झाला.्बंगालच्या उपसागरातील वातावरणातील बदल, अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे पट्टे यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार झाली. त्यामुळे शनिवारी मान्सून केरळच्या किनारपट्टीसह माहे, दक्षिण अरबी समुद्र, तसेच अरबी समुद्राचा पश्चिम मध्यभाग, लक्षव्दीपपूर्ण, कर्नाटकचा काही भाग, मालदीव, कोमोरीन, तामिळनाडूचा काही भाग, मध्यपूर्व उत्तर बंगालचा उपसागर, ईशान्य भारतातील मिझोरोम राज्यापर्यत मान्सूनने मजल मारली आहे.
अनुकूल स्थितीमुळे मान्सून वेगाने प्रगती करीत आहे. त्यानुसार येत्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण अरबी समुद्र, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, कोकण, आध्रप्रदेश, कर्नाटकचा काही भाग, मध्यपूर्व उत्तर अरबी समुद्र, ईशान्य भारतातीअल काही राज्य, सब हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यात दाखल होणार आहे.