पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यामधील सत्य लवकरच समोर येईल. याप्रकरणी दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 24) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या माहेरी पिंपरी-चिंचवड येथे कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली.
तसेच, त्यांचे सांत्वन केले. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, कस्पटे कुटुंबीयांची जी भावना आहे, त्यानुसार वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये कोणीही दोषी असेल, कितीही मोठा राजकीय नेता, लोकप्रतिनिधी असेल, तरी त्याची चौकशी केली जाईल. (Latest Pune News)
ही घटना खूपच दुर्भाग्यपूर्ण आणि दुःखद आहे. कस्पटे कुटुंबातील मुलगी गेली आहे. त्यांच्या ज्या भावना आहेत, त्याच आमच्याही भावना आहेत. यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही.
लाडकी बहीण, लाडकी मुलगी तशीच लाडकी सूनदेखील असायला हवी, अशी प्रत्येक आई-वडिलांची अपेक्षा असते. या घटनेमुळे अनेक जणांचे डोळे उघडले आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक कारवाई करण्याची अपेक्षा कस्पटे कुटुंबीयांची आहे. राज्य सरकार त्याला सहमत आहे.