

nigdi robbery elderly tied up 6 lakh loot
पिंपरी : पाच दरोडेखोरांनी एका वृद्धाच्या घरात शिरून पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांचे हातपाय बांधले आणि तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. १९) रात्री नऊच्या सुमारास निगडी प्राधिकरणात घडली.
याप्रकरणी चंद्रभान छोटेराम अगरवाल (७६, रा. सेक्टर २७, प्राधिकरण, निगडी) यांनी रविवारी (दि. २०) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पाच अनोळखी दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी टीव्ही पाहत असताना दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चार पुरुष आणि एक महिला थेट घरात घुसले. एकाने त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि "तिजोरी किधर रखा है?" असा सवाल केला. 'तिजोरी नाही' असे सांगताच त्यांनी अगरवाल यांना मागच्या खोलीत नेत हातपाय बांधले आणि तोंडाला चिकटपट्टी लावली.
यानंतर टोळीने घरात कपाटांची उचकापाचक करत दीड तासात सोन्याच्या बांगड्या, अंगठी, नथ, १ किलो चांदीची वीट, चांदीची भांडी, सोन्याची चेन, टायटनची दोन घड्याळे, ५ ते ६ हजार रुपये रोख, आधारकार्ड, गाडीची आरसी, असा ऐवज लंपास केला. दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास आगरवाल यांनी बाल्कनीत येऊन मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. काहीच मिनिटांत निगडी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घरात प्रवेश करून अगरवाल यांची सुटका केली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून शेजाऱ्यांकडून माहिती संकलित केली जात आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.
अगरवाल यांनी अत्यंत बारकाईने टोळीचे निरीक्षण करत पोलिसांना सविस्तर वर्णन दिले. टोळीमध्ये एक पिस्तूलधारी, एक गुबगुबीत टोपीधारी, एक दाढीवाला तरुण, एक बॉबकट केसांची महिला आणि दरवाजाजवळ उभा असलेला पुरुष अशा पाच जणांचा समावेश होता.
दरोडेखोरांनी केवळ घरमालकाच नाही, तर घराजवळील खोलीत राहणाऱ्या वॉचमन अशोक कुमार आणि त्याच्या पत्नी बिभला, मुलगा विकास, मुलगी आरती यांनाही हातपाय बांधून खोलीत कोंडले. खोलीला बाहेरून कडी लावून त्यांनी कुटुंबाला पूर्णपणे वेठीस धरले होते.
चंद्रभान अगरवाल मागील २७ वर्षांपासून पत्नीसमवेत प्राधिकरणात राहतात. त्यांचा मुलगा राकेश अगरवाल कुटुंबासह भोसलेनगरला राहतो. चंद्रभान अगरवाल यांचा चिंचवड एमआयडीसीमध्ये ‘आर. आर. इंडस्ट्रीज’ नावाने बॉयलर बनविण्याचा व्यवसाय आहे. तर मुलगा ‘एबीसी कन्स्ट्रक्शन’ या नावाने बांधकाम व्यवसाय करतो. घराजवळच कामगारांसाठी खोली बांधलेली आहे. त्यात वॉचमन आणि त्याचे कुटुंब मागील आठ वर्षांपासून राहत आहेत. शनिवारी सायंकाळी अगरवाल यांची पत्नी नातीची तब्येत बरी नसल्याने मुलाच्या घरी गेल्या होत्या. त्यामुळे चंद्रभान अगरवाल हे घरी एकटे होते. दरोडेखोरांनी ही माहिती आधीच मिळवून पाळत ठेवत गुन्हा केला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
स्थनिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही, मोबाइल लोकेशन आणि पूर्व गुन्हेगारी नोंदींचा अभ्यास करत आहे. काही विशेष पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली आहेत. शहरात घडलेला हा प्रकार पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत असून वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.