

पिंपरी: नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरच्या रात्री पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शहरातील सर्व प्रमुख चौक, अंतर्गत रस्ते तसेच वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ब्रीथ अनालायझरच्या मदतीने संशयित वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली. नववर्षाच्या रात्री होणारी गर्दी, मद्यपानाचे प्रमाण आणि संभाव्य अनुचित प्रकार लक्षात घेता पोलिसांनी विशेष नियोजन केले होते.
स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांसह वाहतूक शाखा, गुन्हे शाखा आणि विशेष पथके मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरवण्यात आली होती. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर पोलिसांची उपस्थिती ठेवण्यात आली असून, गस्तीद्वारे परिसरावर सतत लक्ष ठेवण्यात येत होते. पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.
‘ड्रंक अँड ड्राईव्ह’अंतर्गत कारवाई
नाकाबंदीदरम्यान दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणारे तसेच मद्याच्या नशेत वाहन चालवणारे अनेक चालक पोलिसांना मिळून आले. या चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टाळावेत आणि नागरिक सुरक्षितपणे नववर्ष साजरे करू शकतील, यासाठी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त कायम ठेवला होता.
नववर्षाचे स्वागत करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सर्व पातळ्यांवर तयारी केली होती. मद्यपान करून वाहन चालवणारे, ट्रिपल सीट आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड