

पिंपरी: कट्टर विरोधक ढोरे आणि शितोळे हे एकत्र आल्याने सांगवी प्रभागातील समीकरण बदलली आहेत. विरोधक भाजपत आल्याने भाजपचे पॅनेल अधिक सक्षम झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासने विजयासाठी मोर्चेबांधणी केली आहे. भाजप आपले पॅनेल पुन्हा राखण्यात यशस्वी होतो का, याची उत्सुकता लागली आहे. पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा प्रभाग आता भाजपच्या ताब्यात आहे. मागील वेळी चारही नगरसेवक भाजपचे होते. भाजपच्या उषा ढोरे यांनी महापौरपद भूषविले. यांच्यासह माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे व शारदा सोनवणे असे पॅनेल होते. भाजपने उषा ढोरे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे यांच्या पत्नी तृप्ती कांबळे आणि राष्ट्रवादी काँग््रेासमधून भाजपत आलेले माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांना उमेदवारी दिली आहे. माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अतुल शितोळे, उज्ज्वला ढोरे, ॲड. निशा वसंत कांबळे, प्रसाद शिंदे असे पॅनेल आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्योती सुवर्णकुमार गायकवाड, रेश्मा चेतन शिंदे, वर्षा निखिल पोंगडे व मनसेकडून राजू सावळे असे पॅनेल मैदानात आहे. काँग््रेासकडून कुंदन कसबे हे उमेदवार आहेत. पारंपरिक विरोधी ढोरे व शितोळे एकत्र आल्याने प्रभागाचे चित्र बदलेले आहे. विरोधात असलेले प्रशांत शितोळे भाजपत आल्याने प्रभागाचे राजकीय गणिते बदलली आहेत. माजी महापौर ढोरे व हर्षल ढोरे यांचा लोकसंपर्क मोठा असल्याने भाजपचा विजय सोपा असल्याचा दावा केला जात आहे. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना व मनसे आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे. भाजप पुन्हा पॅनेल ताब्यात घेण्यात यशस्वी ठरणार का, मतदार कोणाला कोणाला कौल देणार याची उत्सुकता आहे.
प्रभागातील परिसर
सांगवी गावठाण, कुंभारवाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणीनगर, जयमालानगर, उष:काल सोसायटी, पवनानगर, संगमनगर, प्रियदर्शनीनगर आदी.
सांगवी-बोपोडी पुलामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत
सांगवी-बोपोडीस जोडणारा मुळा नदीवरील नव्या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. प्रभागात काँक्रीट तसेच, डांबरी रस्ते करण्यात आले आहेत. जुन्या ड्रेनेजलाईन व जलवाहिन्या बदलून नव्याने टाकण्यात आल्या आहेत. संविधान व माहेश्वरी चौक तसेच, वसंतदादा चव्हाण पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले. जलतरण तलावाचे नूतनीकरण केले आहे. पीडब्ल्यूडी उद्यानात ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्राची उभारणी, वेताळ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सांगवी-दापोडी व स्पायसर कॉलेज पुलाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. स्मशानभूमीचे नूतनीकरण केले आहे. अहिल्यादेवी होळकर दशविधी घाटाचे नूतनीकरण केले आहे. ममतानगर येथे खेळाचे मैदान व सांस्कृतिक केंद्राच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. प्रभागातील शाळा इमारतीत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. इंदिरा गांधी रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एसटी महिला
ब-ओबीसी
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
वाहतूक कोंडीचा त्रास
पवना व मुळा नदीकाठी वसलेला सांगवी परिसर आहे. कामगार, मध्यवर्गीय व गाववाले असे संमिश्र दाट लोकवस्तीचा भाग आहे. पुणे शहराला जोडणारा हा भाग असल्याने वाहतूक रहदारी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. पूल तयार केला. मात्र, त्याला जोडणारे रस्ते अरुंद असल्याने कोंडीचा सामना करावा लागतो. विद्यार्थी येथे भाड्याने राहतात. ते रात्रभर पार्ट्या व धागडधिंगा करत असल्याने रहिवाशांना त्रास होतो. भाजी मंडईत विक्रेते न बसता रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. जागा ताब्यात न आल्याने आरक्षणे विकसित झालेली नाहीत. प्रदूषित नदीमुळे दुर्गंधी व डासांचा त्रास होतो. स्मशानभूमीची जागा अपुरी आहे. गुंठेवारीत दाटीवाटीने अनधिकृतपणे निवासी इमारती बांधल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यावर वाहने लावली जात असल्याने रस्ते अरुंद होऊन वाहतूककोंडी होते.