

बजरंग मासाळ
पिंपरी: सकाळी घरातून बाहेर पडायचे, वेळेत बस मिळवण्यासाठी बसथांब्यावर धाव घ्यायची, बस आली तरी जागा मिळेलच याची शाश्वती नाही. कधी बस थांबत नाही, तर कधी वाहतूक कोंडीत अडकून कामावर पोहोचण्यास उशीर होतो. कसाबसा कारखाना गाठल्यानंतर पत्र्याच्या शेडमधील उकाडा, तापलेल्या यंत्रांची धग आणि कानांवर सतत आदळणारा आवाज सहन करत कामाचा दिवस पूर्ण करायचा. संध्याकाळी पुन्हा तोच प्रवास आणि घरी पोहोचेपर्यंत शरीराचा झालेला शीण! पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन जगण्याचे हे वास्तव आहे.
उद्योगनगरीच्या विकासाची चर्चा करताना नव्या कंपन्या, गुंतवणूक, उत्पादन आणि रोजगाराच्या आकडेवारीला महत्त्व दिले जाते. मात्र, या विकासाचा भार खांद्यावर घेणाऱ्या कामगाराच्या वाट्याला नेमक्या कोणत्या सुविधा येतात, याकडे कितपत गांभीर्याने पाहिले जाते? कामगाराच्या दिवसाची सुरुवातच संघर्षाने होत असेल आणि काम संपल्यानंतरही त्याची फरफट थांबत नसेल, तर औद्योगिक प्रगतीच्या दाव्यांसोबत त्याच्या जगण्याचा हिशेबही मांडण्याची वेळ आली आहे.
बसथांबा आहे; पण बस पकडायची कशी?
औद्योगिक भागातील अनेक कामगारांना कामावर जाण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपनीच्या बससेवेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, प्रत्यक्ष प्रवासात बसची प्रतीक्षा, गर्दी आणि बसथांब्यांवरील अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी बसथांब्यांजवळ उभ्या असलेल्या रिक्षा आणि इतर वाहनांमुळे बस थांबण्यासाठी जागा अपुरी पडते. भरलेली बस थांबत नसल्यास पुढील बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही. शिफ्टची वेळ पाळायची असल्याने कामगारांची धावपळ सुरू होते. बस मिळाली तरी औद्योगिक मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा अंदाज चुकतो. परिणामी, वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात. काही कामगारांना वेळेत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागतो. रोजच्या प्रवासातील ही कसरत त्यांच्या शारीरिक थकव्यात भर घालते. कामगारांच्या या अडचणींकडे केवळ वाहतुकीचा प्रश्न म्हणून पाहून चालणार नाही. उद्योगांच्या शिफ्टच्या वेळा, कामगारांची संख्या, बसफेऱ्यांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष प्रवासी मागणी यांचा एकत्रित विचार करून नियोजन होणे आवश्यक आहे. बसथांब्यांवर अतिक्रमण असेल, तर ते हटविण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणांनी पार पाडली पाहिजे.
पत्र्याच्या छताखाली घामाच्या धारा
कारखान्यातील कामाचे स्वरूप प्रत्येक ठिकाणी वेगळे असले, तरी उष्णता निर्माण करणाऱ्या यंत्रांजवळ किंवा पत्र्याच्या छताखाली काम करणाऱ्या कामगारांसाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. बंदिस्त जागा, अपुरे वायुवीजन आणि उष्णता बाहेर काढणाऱ्या यंत्रणेचा अभाव असेल, तर कामाच्या ठिकाणी घामाच्या धारा लागणे स्वाभाविक आहे. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रे सुरू राहतात; मात्र त्या यंत्रांजवळ काम करणाऱ्या माणसाच्या शरीराची मर्यादा लक्षात घेतली जाते का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुरेसे पिण्याचे पाणी, विश्रांतीची व्यवस्था, योग्य वायुवीजन आणि उष्णतेचा धोका कमी करणाऱ्या उपाययोजना या कामगारांच्या आरोग्याशी संबंधित मूलभूत बाबी आहेत. अर्थात, प्रत्येक कारखान्यात अशीच परिस्थिती आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी कामगारांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, तेथे प्रत्यक्ष तापमानाची नोंद, कामाच्या परिस्थितीचे परीक्षण आणि व्यवस्थापनाची भूमिका तपासणे गरजेचे आहे. उत्पादनाच्या वेगापेक्षा कामगाराचे आरोग्य दुय्यम ठरता कामा नये.
यंत्रांचा आवाज कानावर; सुरक्षा साधनांचा अभाव
उत्पादन विभागात सतत सुरू असलेल्या यंत्रांचा आवाज हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही कामाच्या ठिकाणी मोठ्या आवाजात दीर्घकाळ काम करावे लागते. अशा वेळी योग्य श्रवण-संरक्षक साधने उपलब्ध आहेत का, त्यांचा वापर नियमित होतो का आणि ध्वनीची तीव्रता मोजली जाते का, याची तपासणी आवश्यक आहे. अनेक ठिकाणी श्रवण संरक्षक साधने नसल्याचे दिसून आले आहे. सुरक्षेची साधने केवळ दाखविण्यासाठी उपलब्ध असून उपयोग नाही. कामाच्या स्वरूपानुसार योग्य साधने देणे, यंत्रांची नियमित देखभाल करणे आणि कामगारांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारखान्यातील धोके कामगारांच्या रोजच्या सवयीचा भाग बनले, म्हणून ते दुर्लक्षित करण्याचे कारण ठरत नाहीत.
रात्रपाळी संपते; पण असुरक्षिततेची धास्ती कायम!
रात्रपाळीतील कामगारांचा प्रश्न आणखी वेगळा आहे. दिवसा गजबजलेले औद्योगिक रस्ते रात्री तुलनेने निर्मनुष्य होतात. काही मार्गांवर अपुरे पथदिवे, सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित उपलब्धता आणि बसथांब्यांवरील असुविधा यांमुळे कामावर जाताना किंवा घरी परतताना अडचणी येत असल्याचेही कामगार सांगत आहेत. रात्रपाळी संपल्यानंतर थकलेल्या अवस्थेत घरी जाणाऱ्या कामगाराला सुरक्षित प्रवासाची खात्री मिळणे आवश्यक आहे. पथदिवे सुरू आहेत का, बससेवेच्या वेळा शिफ्टशी जुळतात का, निर्जन मार्गांवर आवश्यक सुरक्षितता आहे का, या प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणांनी द्यायला हवीत. गरजेनुसार कंपनी व्यवस्थापनानेही सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याबाबत पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
केवळ कायदा नको, अंमलबजावणी महत्त्वाची
कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी कायदेशीर तरतुदी असल्या, तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कामाच्या ठिकाणी तापमान, वायुवीजन, पिण्याचे पाणी आणि व्यावसायिक धोक्यांपासून संरक्षण याबाबत लागू नियमांचे पालन होते का, याची कामगार विभागाने नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, सार्वजनिक वाहतुकीच्या समस्या महापालिका आणि पीएमपीएमएलने समन्वयाने सोडविण्याची आवश्यकता आहे. उद्योगनगरीची ओळख केवळ कारखान्यांच्या धुराड्यांनी, उत्पादनाच्या आकड्यांनी किंवा वाढत्या गुंतवणुकीने तयार होत नाही. ती घडविणाऱ्या कामगाराला वेळेत कामावर पोहोचता येते का, त्याला आरोग्यदायी वातावरणात काम करता येते का आणि रात्रपाळीनंतर तो सुरक्षितपणे घरी परततो का, यावरही तिचे यश ठरते. कारखान्यात यंत्रे थांबली, तर उत्पादन थांबते; पण कामगाराचे शरीर थकले, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे जगणे प्रभावित होते. त्यामुळे औद्योगिक विकासाचा गाजावाजा करण्यापूर्वी कामगारांच्या दैनंदिन संघर्षाकडे पाहणे आवश्यक आहे. उद्योगनगरीच्या प्रगतीचा खरा चेहरा तेव्हाच उजळेल, जेव्हा विकासाच्या केंद्रस्थानी केवळ उत्पादन नव्हे, तर उत्पादन घडविणारा माणूस असेल.
घरातून कामावर निघाल्यापासून घरी परतेपर्यंत रोजच कसरत करावी लागते. बसची अनिश्चितता, वाहतूक कोंडी आणि कारखान्यातील उकाडा यामुळे कामाचा ताण आणखी वाढतो. आम्हाला केवळ रोजगार नको, तर सुरक्षित प्रवास आणि आरोग्यदायी वातावरणही हवे.
जितेंद्र मोरे, कामगार
उद्योग चालवताना उत्पादन खर्च, बाजारातील स्पर्धा, वीजदर आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता अशी अनेक आव्हाने असतात. कामगार हे उद्योगाचे महत्त्वाचे बळ आहे. त्यांच्या सुरक्षिततेसह उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी उद्योग आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे.
दामाजी आसबे, उद्योजक