

पिंपरी: गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी- चिंचवड वासीयांना पुण्यातील मानाच्या गणरायाचे तसेच तेथील उत्सव पाहण्यासाठी पीएमपीकडून जादा गाड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव काळात पीएमपी सेवेचा लाभ एक कोटी आठ लाख प्रवाशांनी घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेच यंदा पीएमपीच्या उत्पनात वाढ झाली आहे. यंदाच्या गणेशउत्सवात पीएमपीला 17 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पुणे,पिंपरी चिंचवड शहरातील मंडळाच्या वतीने धार्मिक, सामाजिक, शैक्षिणिक देखावे पाहण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठया संख्येने घराबाहेर पडतात. प्रवाशांच्या सेवेसाठी दररोज विविध मार्गांवर बसेस सोडल्या होत्या. गणेशोत्सवात सात दिवस बससेवा पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. (Latest Pimpri News)
या बससेवाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद होता. यंदा मेट्रोचा फटका पीएमपीला बसला मात्र तिकीट दरवाढीमुळे उत्पन्नात घट झाली नसल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा एक कोटी आठ लाख प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केला. गेल्या वर्षी एक कोटी 28 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. तसेच यदांच्या वर्षी पीएमपीने जादा गाड्या सोडल्या होत्या; तसेच तिकीट दरवाढीमुळे पीएमपीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
प्रवासी घटले मात्र उत्पन्न वाढीवर परिणाम नाही
यंदाच्या गणेशोत्सवात पीएमपीच्या प्रवाशांची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी त्याचा परिणाम पीएमपीच्या उत्पन्नावर झाला नाही. 1 जून रोजी पीएमपीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. यंदाच्या गणेशोत्सवात पीएमपीला 17 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गणेशोत्सव काळात अनेक मार्गांवरील गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होती.