

पिंपरी : नवरात्रोत्सव तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यादृष्टीने सध्या शहरातील देवीच्या मंदिरांत पूर्वतयारी सुरू झाली आहे. दुर्गादेवी (दुर्गादेवी टेकडी), वैष्णोदेवी (पिंपरी), तुळजाभवानी (आकुर्डी), खराळ आई (खराळवाडी), फिरंगाई (दापोडी), मोहटा देवी (थेरगाव), आई माता मंदिर (कासारवाडी) आदी ठिकाणी देवीच्या मंदिर परिसराची साफसफाई, रंगरंगोटी इत्यादी कामे सुरू झाली आहेत.
पिंपरी गावात आणि शाहूनगर येथे महालक्ष्मी तर, पिंपळे गुरव येथे तुळजाभवानी माता मंदिर आहे. या मंदिरांमध्ये सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी करण्यात संयोजकांची लगबग आहे. शहरात आता नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यासाठी शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून आणि सोसायट्यांमध्ये मंडप उभारणी आणि सजावटीची कामांना वेग आला आहे.
यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. देवीच्या मंदिर परिसरात मंडप उभारण्ीच्या कामास वेग आला आहे. घटस्थापनेपूर्वी नवरात्र महोत्सवाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. सध्या शहरामध्ये मंडळांकडून मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे.