

करंजी : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे बुधवारी (दि. 17) मुख्यमंत्री पंचायतराज अभियान राबविण्याबाबत ग्रामसभा बोलावण्यात आली होती. विविध प्रश्नांवरून या ग्रामसभेत राडा उडाला.
महादेव मंदिरासमोर सरपंच मुनिफा शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली. ग्रामसेवक गणेश ढाकणे यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानावरील वाचन पूर्ण होताच विविध प्रश्नांवरून या ग्रामसभेत भलताच गोंधळ उडाला.(Latest Ahilyanagar News)
उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या भावना आणि प्रश्न उपस्थित करताना सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार केला. प्रश्न मांडण्यासाठी माईकचीही मोठी ओढाताण ग्रामस्थांमध्ये झाली. ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांपुढे उपस्थित पदाधिकाऱ्यांना अनुत्तरित व्हावे लागले. प्रश्नांच्या सरबत्तीमुळे काही वेळातच ही ग्रामसभा स्थगित करण्याची वेळ ग्रामसेवक ढाकणे यांच्यावर आली.
त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी व महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्या ठिकाणीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची मागणी केली.
गेल्या तीन वर्षांपासून केवळ प्रोसिडिंग लिहून घेतले जाते, मात्र कारवाई होत नाही. ग्रामसभेला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यांना केवळ नोटिसा पाठवल्या जातात. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. ग्रामसभेत प्रश्न मांडल्यानंतर त्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही, म्हणून अनेक ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना या ग्रामसभेत मांडल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गावांतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, आरोग्याच्या प्रश्नासह वीजप्रश्न यावरूनही ग्रामसभा गाजली.
मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले; परंतु कोणालाही कुठलीही मदत मिळाली नाही, म्हणूनही नुकसानग्रस्तांनी मोठा संताप या ग्रामसभेत व्यक्त केला. ग्रामसभेप्रसंगी ग्रामस्थांच्या भावना तीव्र असल्याकारणाने ग्रामसभा अर्ध्यावरच स्थगित करण्याची वेळ आली.
या ग्रामसभेप्रसंगी उपसरपंच पंकज मगर, ग्रामपंचायत सदस्य फरहद शेख, मुमताज शेख, कल्पना नरवडे, बिस्मिल्ला पठाण, अमोल भुजबळ, सिकंदर पठाण, मन्सूरभाई पठाण, सिराज शेख, नितीन लवांडे, शबाना शेख, प्रदीप ससाणे, अंबादास शिंदे, सतीश साळवे, पप्पू सय्यद, अक्षय साळवे, मनोज ससाणे, प्रसाद देशमुख, सुनील लवांडे, शौकत पठाण, फिरोज सय्यद, मुस्ताक पठाण, जाकिर पठाण, अक्षय कराळे, मन्सूर पठाण, गणेश भोसले, इमरान स्वामी, साहिल खान, शकुंतला माळी, गुलनाज शेख, सीमा बागवान, पार्वती उगले, बानु शेख, मिनाज पठाण, लैला शेख आदी उपस्थित होते.
लवांडे पाटलांची अनुपस्थिती जाणवली
तिसगाव येथील ग्रामसभेला ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे उपस्थित असल्यानंतर येथील ग्रामसभा नेहमीच शांततेत पार पडते. मात्र, लवांडे पाटील आजारी असल्यामुळे बुधवारच्या ग्रामसभेला ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना व्यवस्थितपणे उत्तरेच न देता आल्याने ग्रामसभा अर्ध्यावरच गुंडाळण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली.