

रुईछत्तिशी : नगर तालुक्यात सोमवारी (दि. 15) झालेल्या मुसळदार पावसामुळे वालुंबा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे भाजीविक्रेते, व्यापारी, ग्राहक यांचे मोठे हाल झाले. जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत त्यांना प्रवास करावा लागत होता.(Latest Ahilyanagar News)
राळेगण, गुुंडेगाव, वडगाव तांदळी, राळेगण म्हसोबा, देऊळगावसिद्धी, येथीलही अनेक प्रवासी काही काळ अडकून पडले होते. वालुंबा नदीवरील, लेंडी ओढ्यावरील दोन्हीही पुलांची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वालुंबा नदीला दि. 27 मे रोजी झालेल्या पहिल्याच पावसात महापूर आला होता. यामध्ये गाळेधारकांचे, व्यावसायिकांचे, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्यावेळेसही पुलाला मोठे भगदाड पडले होते. तात्पुरती पुलाची मलमपट्टी करून वाहतूक सुरू करण्यात आली होती. आताही सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुलाला मोठे भगदाड पडले आहे.
या पुलावरून शालेय विद्यार्थी, प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची उंची वाढवावी. नदीपात्रातील पूर नियंत्रण रेषेच्या आतील अतिक्रमणे काढण्यात यावीत, ग्रामसचिवालयाची धोकादायक झालेली इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.