

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीला महाविकास आघाडी एकसंधपणे सामोरी जाणार आहे. त्यासंदर्भात स्थानिक पातळीवर दोन बैठक्या झाल्या आहेत. येत्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन निवडणुकीसाठी समिती स्थापन केली जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. महापालिकेने प्रारुप प्रभागरचना जाहीर करून त्यावर सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. पुढील महिन्यात प्रभागरचना अंतिम होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. (Latest Pimpri News)
जुनीच प्रभागरचना असल्याने त्याला हरकत घेण्यात आली नाही, असे स्पष्ट करीत तुषार कामठे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीकाँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, कम्युनिस्ट, संभाजी बिगेड, आम आदमी पार्टी, डाव्या विचाराचे पक्ष व इतर घटक पक्षांना महाविकास आघाडीत एकत्रित करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीतून सर्व 32 प्रभागांतील 128 जागांवर सक्षम उमेदवार दिले जाणार आहेत. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा भष्ट कारभार आघाडीद्वारे उघड केला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून होणारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक लुटीचे प्रकरणे जनतेसमोर मांडली जाणार आहेत. आघाडी आक्रमकपणे पूर्ण त्वेषाने लढा देणार आहे.
संपूर्ण आघाडी शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचाराने शहरात काम करीत आहे. त्यावर नागरिकांचा विश्वास आहे. सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनाला शहरवासीय भुलणार नाही, सुज्ञ जनता आम्हाला साथ देईल, असा विश्वास कामठे यांनी व्यक्त केला.
आघाडीत एकसुत्रता निर्माण झाली आहे. पुढील आठवड्यात आघाडीतील प्रत्येक पक्ष व संघटनेतील पदाधिकाऱ्यांसमवेत एकत्रित बैठक घेऊन निवडणुकीसाठी समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. त्या समितीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. त्यामुळे नियोजनबद्धरित्या निवडणुकीची काम करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्ष संघटनेत युवा वर्गास प्राधान्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाड्यावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन मजबुतीवर भर देण्यात आला आहे. विशेषत: नव्या दमाच्या तरूण व तरूणींना कार्यकारणीत संधी दिली जात आहे. युवा वर्गास निवडणुकीत प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.