पिंपरी : नित्याच्या वाहतूक कोंडीचा त्रास दूर व्हावा; तसेच अंतर्गत गावातील रहदारी सुरळीत रहावी, यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान 28 किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. या मार्गासाठी पीएमआरडीएकडून भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. या कामाअंतर्गत खेड तालुक्यातील सात गावांतील मोजणी करून जागा संपादित केली जाणार आहे. सध्या दोन गावांची मोजणी करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
राज्यमार्ग प्राधिकरण यांच्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग (एनएच) क्रमांक 60 या महामार्गावरील उन्नत मार्गाचे काम करण्यात येत आहे. उन्नत मार्गाच्या रॅम्पसाठी सात गावांमध्ये 150 खातेदार शेतकर्यांकडून जागेचे संपादन करण्यात येणार आहे. ही जागा पीएमआरडीएच्या हद्दीत असल्याने त्यासाठी खेड तालुक्यातील सात गावांमध्ये पीएमआरडीएतर्फे भूसंपादन करण्यात येत आहे. चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, मौजे कुरुळी, वाकी बुद्रुक, चाकण या गावांमध्ये 9.7457 हेक्टर भू संपादन केले जाणार आहे.
चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द या चार गावांतील भूसंपादनाच्या मोजणीसाठी दोन लाख 67 हजारांचे शुल्क जमा करण्यात आले आहे. सहा मार्गिकेच्या या उन्नत मार्गामुळे भोसरी, मोशी येथील वाहतूक कोंडीची समस्यादेखील सुटणार आहे. त्यासाठी भोसरी आणि मोशी येथेही या मार्गासाठी रॅम्पची उभारणी करण्यात येणार आहे.
सध्या वाकी बुद्रुक आणि चाकण येथील मोजणी पूर्ण झाली असून, उर्वरीत पाच गावांची मोजणी होणे बाकी आहे.